कन्हैय्या कुमारवर चप्पलफेक, बजरंग दलाचा कार्यकर्ता अटकेत
By Admin | Published: April 14, 2016 02:43 PM2016-04-14T14:43:28+5:302016-04-14T18:51:32+5:30
कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करुन काही वेळ होताच त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली, पोलिसांनी चप्पल फेकणा-याला ताब्यात घेतलं आहे
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. १४ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल फेकण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार भाषण देत असताना त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. चप्पल फेकणारा नेमका कोण आहे याची माहिती मिळालेली नाही, मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यक्रम सुरु होण्याअगोदरदेखील कन्हैय्या कुमारविरोधात बजरंग दलाने 'भारत माता की जय' घोषणा देत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. मात्र कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करुन काही वेळ होताच त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. पोलिसांनी चप्पल फेकणा-याला ताब्यात घेतलं आहे.
दरमयान, नागपूरमध्ये आलेला कन्हैया कुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 'जय श्री राम'च्या घोषणा देत निदर्शकांनी कन्हैयाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कन्हैया नागपूरमध्ये आला आहे. भारतमातेचे तुकडे करण्याची भाषा करुन देशाच्या शूर सैनिकांचा अपमान करणा-या कन्हैयाला काही स्वार्थी लोकांनी आज नागपूरमध्ये बोलवले आहे असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.
(सर्व छायाचित्रे विशाल महाकाळकर)