‘कन्हैया कुमारला मुंबईत प्रवेश नको’
By admin | Published: April 22, 2016 03:51 AM2016-04-22T03:51:23+5:302016-04-22T03:51:23+5:30
द्रेशद्रोहाचा आरोपी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैया कुमारला मुंबईत २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्याला प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत.
मुंबई : द्रेशद्रोहाचा आरोपी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैया कुमारला मुंबईत २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्याला प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. वरळी गावात २३ एप्रिलला होणाऱ्या मेळाव्यात कन्हैया कुमारने भाषण केल्यास सभा उधळून लावू, असा इशाराही संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मेळाव्यादिवशी कशाप्रकारे आंदोलन करणार याबाबत सर्वच संघटनांनी गुप्तता पाळली आहे. मात्र कार्यक्रमाला विरोध नसून कन्हैया कुमारला विरोध असल्याची प्रतिक्रिया हिंदू गोवंश रक्षा समितीचे वैभव राऊत यांनी व्यक्त केली. राऊत म्हणाले की, कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. हिंदू धर्माविरोधात कन्हैया कुमारकडून जी वक्तव्ये करण्यात येत आहेत त्यामुळे येथील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. परिणामी दादर पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अन्यथा कार्यक्रमात कन्हैया कुमारला प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे.
या आंदोलनात हिंदू गोवंश रक्षा समितीसोबत हिंदू राष्ट्र जनजागरण समिती, हिंदू जनजागृती समिती, शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांसह माजी स्वातंत्र्यसैनिक सहभागी होणार आहेत.