कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा ही चुकच !
By admin | Published: April 26, 2016 02:05 AM2016-04-26T02:05:56+5:302016-04-26T02:05:56+5:30
जाती तोडो, समाज जोडो अभियानाप्रित्यर्थ बुलडाणा येथे आले असता रामदास आठवले यांची लोकमतशी चर्चा.
सिध्दार्थ आराख/बुलडाणा
जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या, हे आता सिध्द झाले आहे. या प्रकरणाच्या कारवाईत दिल्ली पोलिसांची घाई दिसून आली आहे. कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी कन्हैयावर थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून चुकच केली, असे मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जाती तोडो, समाज जोडो ही कन्याकुमारीहून निघालेली भारत भीमरथ यात्रा रविवारी बुलडाण्यात दाखल झाली, त्यावेळी ते 'लोकमत'शी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली.
प्रश्न : सध्या कन्हैयाच्या महाराष्ट्रात सभा आणि त्याच्यावर ठिकठिकाणी हल्ले होत आहेत, याबद्दल काय वाटते?
कन्हैया कुमारवर हल्ले करून उगाच त्याला कोणी मोठे करू नये, तसा तो दोषीही नाही. त्याने व त्याच्या मित्रांनी देशाविरूध्द घोषणा दिल्या नव्हत्या; मात्र अफजल गूरुच्या फाशीच्या दिवशी कन्हैया आणि त्याचे संघटन एकत्र का आले होते, याचे उत्तर त्यानेच द्यावे. जेएनयुच्या घटनेमध्ये दिल्ली पोलिसांनीच त्याला मोठे केले. आता ठिकठिकाणी त्याच्यावर हल्ले करून त्याला पुन्हा हिरो बनविले जात आहे. हे चुकीचे आहे. हे थांबले पाहिजे.
प्रश्न : रोहीत वेमुलाप्रकरणी आपली काय भूमिका काय ?
रोहित वेमुलावर अन्यायच झाला. रोहीतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहीजे. मी स्वत: राज्यसभेत सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होता काम नये आणि आत्महत्येची वेळ तर येऊच नये.
प्रश्न : वेगळ्य़ा विदर्भाच्या मागणीवर सर्वच विदर्भवादी एकत्र का येत नाहीत, ही श्रेयाची लढाई आहे काय?
वेगळ्या विदर्भासाठी सर्वच विदर्भवादी एकत्र येत नसले, तरी सर्वांची मागणी एकच आहे. श्रेय कुणी घ्यायचे तो नंतरचा प्रश्न आहे. आधी विदर्भ वेगळा होऊ द्या. भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरच निवडणुका लढल्या आणि ते आपल्या मुद्यावर ठाम आहेत. शिवसेना वगळता सर्वच पक्ष आरपीआयसहीत वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे.
प्रश्न : न्यायालयाचे आदेश असताना महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे योग्य आहे काय ?
घटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे मंदिरात महिलांनाही प्रवेश मिळायलाच पाहिजे, या मताचे आपण आहोत. तो घटनादत्त अधिकार आहे. त्याचे उल्लंघन होऊ नये.
प्रश्न : रिपाइंच्या ऐक्यावर केवळ चर्चा होते, ऐक्य का होत नाही ?
चर्चा झाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला मुर्त स्वरुप येत नाही. योग्य वेळी रिपाइंचे सर्व गट-तट एकत्र येतील आणि ऐक्य निश्चित होईल. त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणण्याची गरज आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेणार आहोत. येणार्या निवडणुकीपूर्वी ऐक्य झाल्यास इतर पक्षांना हादरा बसेल यात शंका नाही.
प्रश्न : येणार्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय राहील ?
आम्ही भाजपला केवळ पाठिंबा दिला आहे. आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. येणार्या काळात सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन पक्ष बांधणी करणार आहोत व सर्वच जातीच्या घटकांना पक्षात संधी देण्यात येईल.