ठाकरे गटाचे कणकवलीतील नेते संदेश पारकर मंत्री रविंद्र चव्हाणांच्या भेटीला; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 11:52 AM2023-05-30T11:52:27+5:302023-05-30T11:59:37+5:30
मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत.
मुंबई: राष्ट्रवादीत असताना शिवसेनेचे तत्कालीन नेते नारायण राणे यांना टफफाईट देणारे कणकवलीचे सध्या ठाकरे गटात असलेले नेते संदेश पारकर यांनी आज मुंबई-गोवा हायवेवर येत भाजप नेते पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रेंगाळला आहे. यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भाजपा नेते राजन तेली यांनी देखील चव्हाण यांची भेट घेतली. चव्हाण यांच्या कारमध्ये भाजपाचे आमदार नितेश राणे देखील होते.
चव्हाण यांनी गणेशोत्सवापर्यंत मुंबई गोवा हायवेचा पहिला टप्पा कार्यन्वित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर पारकर यांनी चव्हाण यांच्याशी जुने संबंध असल्याचे सांगितले.
मधल्या काळात सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकेकाळचे कट्टर वैरी असललेले राणे आणि पारकर एकाच पक्षात आले. परंतू, पुन्हा त्यांच्यात फूट पडली आणि पारकर शिवसेनेत गेले. पारकर गेल्या काही काळापासून शिवसेनेत सक्रीय नव्हते. भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठाकरे गटातील अस्वस्थ नेत्यांना आपल्या बाजुने करा, असा आदेश देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांनी चव्हाण यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आल आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाबाबत वक्तव्य केले आहे. पूर्ण ठाकरे गट अस्वस्थ आहे. येत्या काळात याची तुम्हाला प्रचिती येईल, असे सुतोवाच फडणवीस यांनी दिले. याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंना सहजच भेटायचे होते. कालची भेट ही अराजकीय होती, गप्पांसाठी होती असे फडणवीस म्हणाले.