कान्होजीराजे आंग्रे घराण्याच्या 282 वर्षांच्या प्राचीन परंपरेच्या गौरीचे घेरीयामध्ये आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 08:47 PM2016-09-08T20:47:35+5:302016-09-08T20:47:35+5:30
आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.
जयंत धुळप, ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 8 - तब्बल 282 वर्षांची प्राचीन परंपरा असणा-या सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या घराण्याच्या गौरींचे आगमन गुरुवारी संध्याकाळी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी झाले.
आंग्रे घराण्याच्या या गौरीची प्राचीन परंपरा सर्वप्रथम, सरखेल कान्होजीराजे यांचे पुत्र व स्वराज्याचे तृतीय सरखेल संभाजीराजे आंग्रे यांच्या कालखंडात सन 1733-1734 मध्ये सुरू झाली असल्याचा पहिला संदर्भ उपलब्ध आहे. त्या वेळी गौरी साठीचा खर्च दप्तरी नमूद केलेला आढळला असल्याची माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी गुरुवारी संध्याकाळी लोकमतशी बोलताना दिली आहे.
सद्यस्थितीत अलिबागच्या समुद्रात अस्तित्वात असलेल्या कुलाबा किल्ल्यातील नानीसाहेबांचा वाडा या नावाने ओळखल्या जाणा-या वाड्यात संभाजीराजे आंग्रे यांनी 1733-1734 मध्ये सर्वप्रथम गौर आणल्याचीही नोंद उपलब्ध आहे. कुलाबा किल्ल्यातील शेवटच्या महाभयानक अग्निप्रलयात हा नानीसाहेबांचा वाडा भस्मसात झाला. मात्र त्याचे अवशेष आपल्या किल्ल्यात गणेश मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला आजही दिसून येतात, अशीही माहिती त्यांनी अखेरीस दिली.
(छाया-जयंत धुळप)