आंजर्ल्यात भरणार कासव महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 03:01 AM2017-04-03T03:01:17+5:302017-04-03T03:01:17+5:30
सागरी कासवांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी आंजर्ला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील कासवांची घरटी संरक्षित केली
मुंबई : मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी, वाढणारे प्रदूषण, मांसासाठी होणारी कासवांची हत्या आणि कासवांच्या अंड्यांची चोरी अशा कारणांमुळे सागरी कासवांचे अस्तित्व जगभरात धोक्यात आले आहे. सागरी कासवांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी आंजर्ला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. कासव संरक्षण मोहिमेंतर्गत ४ ते ७ एप्रिल आणि १५ ते २३ एप्रिलदरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दापोली तालुक्यात असलेले आंजर्ला गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. आंजर्ला गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला असून, भरपूर निसर्गसंपन्नता आहे. यामुळे सागरी कासवांच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायत आंजर्ले, कासव मित्रमंडळ आंजर्ले यांच्यातर्फे आणि वनविभाग रत्नागिरी, सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने केलेल्या कासव महोत्सवात, सकाळी ७ आणि सायंकाळी ६ वाजता कासवे समुद्रात सोडण्यात येणार आहेत.
या महोत्सवात कासवांसंबंधित माहिती देण्यासाठी, तिथे कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. कासवांबरोबरच कोकणातील निसर्गाची ओळख व्हावी, यासाठी निसर्गभ्रमंती, कांदळवनाची, तसेच पक्षांची माहिती कार्यकर्त्यांतर्फे पर्यटकांना देण्यात येणार आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम गेली १४ वर्षे सातत्याने सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून १ हजारहून अधिक घरटी संरक्षित करण्यात येऊन, ४० हजारपेक्षा पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
समुद्रात गेलेली पिल्ले मोठी होऊन, त्याच किनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत येतात. जवळपास १ हजार पिल्लांमधून केवळ १ पिल्लू वाचून मोठे होते. यावरून कासव संवर्धनाचे कार्य किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन स्थानिकही यात सहभागी होतात. (प्रतिनिधी)
असा होतो
कासवाचा जन्म!
सागरी कासवे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. किनाऱ्यावरील वाळूत मागच्या पायांनी खड्डा करतात. त्यात १०० ते १५० अंडी घालून खड्डा बुजवतात. त्यानंतर, समुद्राकडे परत जातात. कासवे परत गेल्यावर, कधीही आपल्या घरट्याकडे परत येत नाहीत. खड्ड्यात घातलेली ही अंडी नैसर्गिक उष्णतेने उबून ४५ ते ५५ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ती ४ ते ५ दिवसांनी वाळूतून बाहेर पडून आपोआप समुद्रात जातात.
>उपाध्ये व केळस्कर यांना कासवमित्र पुरस्कार
सह्याद्री निसर्गमित्र यांच्या वतीने देण्यात येत असलेल्या कासवमित्र पुरस्कारासाठी वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील अभिनय केळस्कर यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार ५ एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. रोख रुपये पाच हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सह्याद्री निसर्गमित्रच्या वतीने सन २००२-०३ सालापासून सागरी कासव संरक्षण मोहिमेत यशस्वी कार्य करणाऱ्या व्यक्तींना कासवमित्र पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत नंदकुमार पाटील, वेळास (२००४), चारुहास टिपणीस व रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, महाड (२००५), रामदास महाजन, कोळथरे (२००७), जयंत कानडे, मारळ (२००९) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.मोहन उपाध्ये हे मुंबई येथील नोकरी सोडून वेळासमध्ये परतले. तेथे सह्याद्रीचे कासवांचे काम पाहून त्यामध्ये सामील झाले. पुढे सातत्याने हे काम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात राहिले. वेळासमधील ग्रामस्थ्यांना बरोबर घेत विविध नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळासबरोबर आजूबाजूच्या गावांत कासव संरक्षण यशस्वी केले.
अभिनय केळस्कर यांनी २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवून आजूबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरुवात केली.