कंत्राटदारानेच तोडला नाल्यावरील पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:37 AM2017-07-29T04:37:51+5:302017-07-29T04:37:51+5:30
नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंटच्या छोट्या पुलाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने स्वत:च पूल तोडल्याचा प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडला.
शेंबाळपिंपरी (यवतमाळ) : नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंटच्या छोट्या पुलाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या कंत्राटदाराने स्वत:च पूल तोडल्याचा प्रकार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे घडला. ग्रामपंचायतीने दिलेल्या तक्रारीवरून कंत्राटदारासह त्याच्या पाच सहकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विद्यार्थी व गावकºयांना जाणे-येणे सोयीचे व्हावे, यासाठी पुसद-हिंगोली मार्गावरील मुळावा फाट्याजवळ नाल्यावर ग्रामपंचायतीने या पुलाचे बांधकाम कंत्राटदार हाफिजुद्दीन सिद्धीकी यांच्याकडून करुन घेतले. त्यासाठी ५३ हजार रुपये खर्ची पडले. मुख्य कंत्राटदार आणि शाखा अभियंत्याच्या सांगण्यावरून आपण हा पूल बांधला असे सिद्दीकी यांचे म्हणणे आहे. त्याचे बिल मिळावे यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीत चकरा मारल्या. वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्याने संतापलेले सिद्दीकी गुरुवारी सकाळी शेंबाळपिंपरीत आले आणि त्यांनी हा पूल तोडला. यावेळी उपसरपंचांनी कंत्राटदाराला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु सिद्दीकी यांनी उलट त्यांनाच शिवीगाळ केल्याचे समजते. अखेर सरपंच शांताबाई मासोळकर यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.