कपालेश्वर मंदिर प्रवेश वाद; तृप्ती देसाई यांच्यावर चप्पल फेक
By admin | Published: May 19, 2016 06:27 PM2016-05-19T18:27:06+5:302016-05-19T18:36:24+5:30
कपालेश्वर मंदिरात गाभाऱ्यात प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांना भाविकांच्या विरोधामुळे दर्शन न घेताच आज माघारी परतावे लागले.
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १९ : कपालेश्वर मंदिरात गाभाऱ्यात प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांना भाविकांच्या विरोधामुळे दर्शन न घेताच आज माघारी परतावे लागले. देसाई जात असतांनाच संतप्त भाविकांनी विश्वस्त कार्यालयावर दगडफेक करून मोडतोड केली. याप्रकरणी तीन ते चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले देसाई यांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले.
आज दुपारी दोन वाजता देसाई येणार असल्याने विरोध करणारे तीनशे ते चारशे भाविक जमा झाले होते मंदिरात कोणालाही प्रवेश नाकारला जात नसल्याचे विश्वस्तांनी सांगितले, मात्र संतप्त भाविकांचा विरोध कायम होता. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी देसाई यांना प्रवेश करू नये असे सांगून तसे लेखी दिल्याने गोंधळ अधिकच वाढला.
पोलिसांच्या सूचनेमुळे आपण आज मंदिरात प्रवेश केला नसल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले मात्र २६ मे रोजी आपण पुन्हा येउन मंदिरात प्रवेश करू असेही त्यांनी सांगितले.