कापसेंना डावखरेंनी दाखवला होता कात्रजचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2016 03:37 AM2016-04-28T03:37:56+5:302016-04-28T03:37:56+5:30

१९८८ साली कल्याणमध्ये अखिल भारतीय साहित्य संमलन घेण्याकरिता आपले सर्व राजकीय वजन खर्ची घातले होते.

Kapasena Daavkhereni had shown the Katraj Ghat | कापसेंना डावखरेंनी दाखवला होता कात्रजचा घाट

कापसेंना डावखरेंनी दाखवला होता कात्रजचा घाट

Next

मुरलीधर भवार,  

कल्याण-माजी खासदार दिवंगत राम कापसे यांनी १९८८ साली कल्याणमध्ये अखिल भारतीय साहित्य संमलन घेण्याकरिता आपले सर्व राजकीय वजन खर्ची घातले होते. मात्र ठाणे शहराचे तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांनी डावपेच खेळून साहित्य संमेलन ठाण्यात घेतले. त्यामुळे त्यानंतर गेली २८ वर्षे कल्याणला पुन्हा संधी मिळालेली नाही.
कल्याणमधील सुसंस्कृत राजकीय नेते अशी ओळख असलेल्या राम कापसे १९८८ साली आमदार होते. कापसे हे रुपारेल महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख होते. त्यांचा मराठी साहित्य हाच अभ्यासाचा विषय होता. मराठी साहित्याचे सौंदर्य शास्त्र हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ््याचा विषय होता. कापसे व्यासंगी होेते. त्यांचे वाचन दांडगे होते. त्यांनी १९८८ साली कल्याणमध्ये आखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या मागणीला त्यावेळचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद केसकर आणि बाबा यार्दी यांनी पाठिंबा दिला होता.
मात्र ठाण्याचे तत्कालीन महापौर वसंत डावखरे यांना कापसे यांच्या साहित्य संमेलन आयोजनाची कुणकुण लागताच हे संमेलन कुठल्याही परिस्थितीत कल्याण ऐवजी ठाण्यात घेण्याचे डावपेच ते खळले. त्यावेळी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम नाटककार वसंत कानेटकर होते. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याशी असलेल्या सौहार्दपूर्ण संबंधातून डावखरे यांनी संमेलन ठाण्यात होईल, याचा बंदोबस्त केला. डावखरेंच्या राजकीय वजनापुढे कल्याणचा टिकाव लागला नाही.डावखरे यांच्या राजकीय कुरघोडीमुळे कापसे निराश झाले. त्यांनी पुन्हा संमेलनासाठी हट्ट धरला नाही. त्यानंतर बराच काळ निघून गेला.
आत्तापर्यंत पार पडलेल्या साहित्य संमेलनात सगळ््यात जास्त म्हणजे दहावेळा पुण्याला संमेलन पार पडले आहे. पुणे जिल्ह्यात आळंदी, सासवड आणि पिंपरी चिचवड याठिकाणीही संंमेलने पार पडली. मुंबईत सहावेळा संमेलन पार पडले. पुणे मुंबई सोडले तर अन्य शहरांना तो मान फारच कमी वेळा मिळाला आहे. त्यात काही शहरांचा विचारच केला गेलेला नाही. १९८८ साली ठाण्याने संमेलन पळवल्यानंतर पुन्हा २०११ साली ठाण्यात साहित्य संमेलन भरले. यावेळी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी हे संमेलन यशस्वी केले.
२०१६ सालचे अखिल भारतीय नाट्य संमेलनही ठाण्यात पार पडले. यासाठी शिंदे यांचाच पुढाकार होता. कल्याण नगरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. कल्याणला एक इतिहास आहे. कल्याणचे भारताचार्य वैद्य हे १९०८ साली पुणे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन कल्याणमध्ये घेण्याची मागणी सलग चारवेळा करण्यात आली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले तरच ते शक्य आहे. त्यांनी त्यांचे राजकीय वजन वापरल्यास ठाण्यानंतर आता कल्याणचे संमेलन शिंदे यशस्वी करु शकतात. शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचा तो लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे पुत्राच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द पालकमंत्री या साहित्य संमेलनाचेही पालकत्व स्वीकारणार का, ़याबाबत साहित्यप्रेमींना उत्सुकता आहे.

Web Title: Kapasena Daavkhereni had shown the Katraj Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.