कापसेंनी कापले पटवारींचे तिकीट?

By admin | Published: August 4, 2016 02:42 AM2016-08-04T02:42:56+5:302016-08-04T02:42:56+5:30

१९९०च्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण विधानसभा मतदारसंघातून एकमुखाने माझे नाव नक्की झाले होते.

Kapaseni chopped tickets to Patwari? | कापसेंनी कापले पटवारींचे तिकीट?

कापसेंनी कापले पटवारींचे तिकीट?

Next


डोंबिवली : १९९०च्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण विधानसभा मतदारसंघातून एकमुखाने माझे नाव नक्की झाले होते. तशी शिफारस केल्याची माहिती मला राम कापसे यांनीच दिली होती. पण, आयत्या वेळी माझ्याऐवजी जगन्नाथ पाटील यांचे नाव घोषित झाले. माझा पत्ता कापण्यात आला, अशी खळबळजनक माहिती श्री.वा. तथा आबासाहेब पटवारी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे.
संधी असून, क्षमता असून आणि पक्षातून पाठिंबा असूनही अन्याय झाल्याची खंत पटवारी यांनी व्यक्त केली आहे. नववर्ष स्वागतयात्रेसारखा संस्कृतीचे दर्शन घडवणारा-राज्यातच नव्हे, तर देश-परदेशात गाजलेला नावीन्यपूर्ण उपक्रम, गणेश मंदिरातून नगराचे केलेले प्रतिनिधित्व, डोंबिवली नागरी सहकारी बँकेची स्थापना, टिळकनगर शाळेतील काम करत त्यांनी आपल्या विविधांगी प्रतिभेचे दर्शन घडवले. पण, राजकारणाच्या क्षेत्राने हुलकावणी दिली, ती कायमचीच. लोकांमधून निवडून आलेले डोंबिवलीचे नगराध्यक्ष अशी ज्यांची ओळख आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामांतून ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा, कर्तबगारीचा ठसा उमटवला आहे, ज्यांनी जनसंघ ते भाजपा असा राजकारणाचा दीर्घ प्रवास अनुभवला आहे, अशा पटवारी यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण करतानाच ‘सहस्रचंद्रदर्शन’ या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपल्या मनातील खंत, उपेक्षा, घुसमट व्यक्त केली आहे. हे आत्मचरित्र २७ आॅगस्टला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते प्रकाशित होते आहे.
उमेदवारी डावलण्यामागे परिवाराच्या ब्राह्मणकार्डापेक्षा भाजपाचे आगरीकार्ड प्रभावी ठरल्याची त्यांच्या निकटवर्तीयांची भावना आहे. एकतर, राम कापसे लोकसभेवर असल्याने दुसरा ब्राह्मण उमेदवार नको, असा युक्तिवाद काहींनी त्या वेळी केला, तर कापसेंना विधानसभा-लोकसभा अशी दीर्घकाळ संधी न देता त्यांनाच बदला आणि आबासाहेबांना संधी द्या, असाही मतप्रवाह होता. शिवाय, कापसे यांना आपल्याच मतदारसंघात नवे राजकीय आव्हान नको होते, अशा कारणांमुळे आबासाहेबांचे तिकीट गेले आणि पक्षीय राजकारणातील त्यांच्या प्रगतीचे पंख कापले गेले, ते कायमचेच. आजवर या विषयावर गप्प असलेल्या आबासाहेबांनी आत्मचरित्रात मात्र ही खदखद व्यक्त केली आहे.
पक्षातीत मैत्री असल्याने नकुल पाटील यांनी जाहीररीत्या खंत व्यक्त करत ‘आबासाहेबांना पक्षाने कुजवले’, अशी भावना व्यक्त केली होती. पण, पटवारी यांना पक्षाकडून पुन्हा तशी संधी मिळाली नाही. लोकांमधून निवडून येऊन नगराध्यक्ष झालेल्या या व्यक्तीला नंतर नगरसेवकपद देऊ केले गेले. ते मात्र त्यांनी नाकारले. संघाला विश्वासात घेणे गरजेचे/५
>आबासाहेबांचे मौन निमंत्रणात व्यस्त
‘सहस्त्रचंद्रदर्शन’ या आत्मचरित्रातील प्रकरणांबाबत आबासाहेब तूर्त फारसे काही बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. आत्मचरित्राची छपाई सुरू आहे. एकदा ते प्रकाशकांकडे दिले की पुढील जबाबदारी त्यांची, असे मोघम उत्तर देत ते त्याची उत्सुकता कायम ठेवतात. डोंबिवलीत सावित्रीबाई फुले सभागृहात २७ आॅगस्टला संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रणात ते सध्या व्यस्त आहेत.

Web Title: Kapaseni chopped tickets to Patwari?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.