ठाकरे सरकारकडे कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधी नाही; कपिल पाटील यांनी साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 07:36 PM2021-09-04T19:36:36+5:302021-09-04T19:37:27+5:30
राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता.
कल्याण-राज्यात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी 44 कोटीचा निधी दिली होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कल्याण पश्चिमेच्या विकासासाठी निधीच मिळालेला नाही. भाजप आणि ठाकरे सरकार यांच्यात हाच फरक आहे, अशी टिका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली आहे. या टिकेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरातील उद्यानाचा विकास माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून करण्यात आला होता. या उद्यानाचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांनी उपरोक्त टिका केली. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी शशिकांत कांबळे, प्रेमनाथ भोईर, वरुण पाटील, मोरेश्वर भोईर, संजय कारभारी आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी सांगितेल की, ठाणो-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पात भिवंडी ते कल्याण दरम्यान कामाची निविदा देखील अद्याप काढलेली नाही याकडे लक्ष वेधले.
आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही असे वक्तव्य केले होते. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मंदा म्हात्रे यांची काय समस्या आहे हे मी सांगू शकत नाही. मात्र मोदी सरकारने 11 महिलांना मंत्री पद दिले आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात महिला कधीच मंत्री झाल्या नव्हत्या. तरी देखील भाजपने महिलांचा सन्मान केला नाही असे वक्तव्य करणो हे अयोग्य आहे.
ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी थेट बोलावे
महागाईच्या मुद्यावर कल्याणचे शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सोशल मिडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. 2014 मध्ये ज्यांना लोकसभेत निवडून दिले आहे. त्यांची जागा दाखवून द्या. याविषयी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जो ज्या संस्कृतीतून येतो. त्याची तशी भाषा असते. ही पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वच खासदारांना लागू होते. ज्यांना आम्हाला बोलायचे आहे. त्यांनी थेट आम्हाला बोलावे असे आव्हान पाटील यांनी केले आहे.