केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी सुचविला पाणीपुरवठ्याचा नवा पर्याय; २४ गावांची तहान भागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:17 PM2021-11-15T18:17:38+5:302021-11-15T18:19:01+5:30
ही संकल्पना यशस्वी झाल्यास या खदाणींमधून दररोज सुमारे सात दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार असून याद्वारे तब्बल २४ गावांची तहान भागणार आहे.
नितिन पंडीत
भिवंडी:भिवंडीतील शहराबरोबरच ग्रामीण भागातील पाणी समस्या गंभीर झाली असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सध्या शासन स्तरावर विशेष मोहीम राबविली जात असून आता बंद पडलेल्या दगड खदानींमधील पाणी शुद्ध करून ते उपयोगात आणण्याची संकल्पना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सुचविली आहे. ही संकल्पना यशस्वी झाल्यास या खदाणींमधून दररोज सुमारे सात दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होऊ शकणार असून याद्वारे तब्बल २४ गावांची तहान भागणार आहे.
खदानीतील साचलेल्या पाण्यातूनच पाणीपुरवठा योजना साकारण्याचा पर्याय केंद्रीय मंत्री पाटील यांनी सुचविला आहे. त्यासाठी रविवारी भिवंडी तालुक्यातील कालवार गावालगतच्या खदानीची स्वतः पाटील यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी देखील केली आहे. कालवार येथील खदानीतून दररोज ७ दशलक्ष पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. आडे यांनी या पाहणी दौऱ्याप्रसंगी व्यक्त केला आहे.
भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली होती. त्यात खदानीतील साचलेल्या पाण्याबाबतही चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी कालवार येथील खदानींची पाहणी केली. या वेळी स्टेमचे महाव्यवस्थापक संकेत घरत, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. आडे यांच्यासह विविध गावातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. कालवार येथील खदानीतून ७ दशलक्ष लिटर पाणी साकारल्यास, भिवंडी तालुक्यातील ३४ पैकी २४ गावांसाठी वेगळी पाणीपुरवठा योजना साकारता येईल. तर स्टेमकडून सध्या होणारा पाणीपुरवठा उर्वरित गावांमध्ये वळविता येणार आहे. पाणी शुद्धीकरण व पुरवठा करण्यासाठी स्टेम व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी सुचना पाटील यांनी यावेळी केली असून भिवंडी तालुक्यातील पाये गाव-ब्राह्रण पाडा येथील खदानीतील पाण्याचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भिवंडीतील ३४ गावांना जादा पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.