कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

By admin | Published: September 9, 2016 05:28 PM2016-09-09T17:28:58+5:302016-09-09T17:56:29+5:30

आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना

Kapil Sharma to get complaints from the public, do not please the Chief Minister! | कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!

Next
>योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
कपिल शर्मांनी मुंबई महापालिकेच्या अधिकारी लाच मागत असल्याची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून केली काय, नी लगेच खुद्द मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शर्मांच्या आलिशान इमारतीच्या बांधकामप्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखाची लाच मागितल्याचा दावा शर्मांनी केला आहे.
शर्माजी, महाराष्ट्रातली जनता असंख्य कैफियती घेऊन मंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, पोलिसांचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, जागांच्या भावांचे प्रश्न असे सगळे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांची तंत्रज्ञानाप्रती असलेली रूची बघून अनेकांनी ट्विटर अकाउंट्सपण उघडली आणि जनतेच्या कैफियती मांडत मुख्यमंत्र्यांना टॅग पण केलं. पण, तक्रारीची दखल किंवा रिट्विट तर सोडा, साधं लाइकपण ते करत नाही हो..! 
पण तुम्ही एक कैफियत काय मांडली सगळं मंत्रालय नी मुंबई महापालिकेची फोर्टातली इमारत कामाला लागली की हो! 
तर आमची तुम्हाला एक नम्र विनंती आहे, या आमच्या कैफियती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवा ना प्लीज. किंवा असं करा ना, तुमच्या कॉमेडी विथ कपिलमध्ये राज्यातल्या जनतेच्या व्यथांची खिल्लीच उडवा ना! माध्यम काही असो, व्यथांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेणं महत्त्वाचं, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता यावर आमचा विश्वास बसला आहे.
तर, शर्मासाहेब राज्याच्या जनतेच्या काही व्यथा देत आहोत, बघा जरा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वशिला लावता आला तर...
 
- कांद्याचा भाव कधी 2 रुपये किलो होतो तर कधी 100... एकतर शेतकरी भरडून निघतो किंवा ग्राहक. मध्यम भाव स्थिर करता येईल असं काही करता येईल का, एवढं जरा विचारा ना फडणवीस साहेबांना? 
 
- राज्याचं शिक्षणक्षेत्र म्हणजे खेळ झालाय साहेब. कारण क्रीडामंत्रीच आमचे शिक्षणमंत्री आहेत. नीटवरून झालेला घोळ ताजा आहेच... आता थेट पुढच्या वर्षी पुन्हा असाच घोळ होईल नीटपणे... विधी किंवा कायद्याच्या पहिल्या वर्षाच्या अॅडमिशन अजून झालेल्या नाहीत. इतर कॉलेजांमधलं एक सत्र संपत आलं. ती सगळी मुलं लॉच्या भावी विद्यार्थ्यांना हसतायत, तुमच्या शोमधल्या प्रेक्षकांसारखी. मुख्यमंत्र्यांना जरा सांगा की शिक्षण हे महत्त्वाचं क्षेत्र आहे, जरा सीरियसली घ्या की हे खातं.
 
- मुंबईत तुम्ही इमारत बांधताय... पण तुम्हाला माहित्येय का इथल्या भूमीपुत्राला वन रूम किचन नाही परवडत या शहरात... आता बदलापूर नी वसईपण खिशाबाहेर चाललेत नी इथला माणूस आता कर्जत नी विरारच्याबाहेर फेकला जातोय.
मुख्यमंत्र्यांकडे जरा शब्द टाकून जागांचे भाव उतरतील असं काही तरी करा की... तुम्ही हे केलंत ना शर्मासाहेब... तर हे लाखो लोकं, कम्प्युटरवर तुमचाच स्क्रीन सेव्हर ठेवतील आणि झोपले तरी कॉमेडी विथ कपिल शर्मा बंद न करता तुमचा टीआरपी वाढता ठेवतील.
- शर्माजी आमच्या पोलीसांवर लाचखोरीचे आरोप होतात, दंडेलशाहीचेही आरोप होतात. पण तुम्हाला खरं सांगू का, ते किती तास काम करतात, कधी झोपतात, काय खातात पितात, त्यांचं कुटुंब कसं वाढतं, पोरांना दिवसेंदिवस बापाचं तोंडदेखील बघायला मिळत नाही, रहायला पक्की घरं नाहीत, घरी गणपतीचं दर्शन घेता येत नाही आणि सार्वजनिक गणेशाला सुरक्षा पुरवावी तर मंडळाचे कार्यकर्ते धक्काबुक्की करतात. दहशतवादी एके-47 घेऊन येतात, नी आमचे पोलीस दंडुके घेऊन त्यांच्याची लढतात.
सगळ्या सरकारांनी पोलीसांना एवढी आश्वासनं दिलीयत ना, तेवढी तर 2014 मध्ये मोदीसाहेबांनी पण दिली नव्हती. तर, पोलीसांना चांगली घरं द्या, मुलांना शिक्षण द्या, नोकऱ्या द्या, भरती करताना पोरांची काळजी घ्या... (अति धावडवल्यामुळे रिकाम्या पोटी पोरांचे जीव गेलेत हे तुम्ही ऐकलं असेलंच.) आणि मुख्य म्हणजे संख्या वाढवा म्हणजे एका वेळच्या जेवणाला तरी ते घरी जाऊ शकतील.... 
त्यांना म्हणावं, शेकडो प्रकारचे अधिभार लावले आहेत ना आमच्या माथी... पोलिसांच्या कल्याणासाठी हवं तर आणखी एक अधिभार लावा...एवढं जरा तुम्ही आवर्जून सांगाच, मुख्यमंत्र्यांना...
यादी तर इतकी मोठी आहे ना शर्माजी की तुमचा कॉमेडी विथ कपिलचा रडारडी विथ कपिल होईल... पण एक आणखी महत्त्वाची मागणी तेवढी त्यांच्या कानावर घालाच...
त्यांना म्हणावं, जसं सेलिब्रिटींचा टिवटिवाट तुम्ही लक्ष घालून बघता ना, तसंच जरा स्थानिक वृत्तपत्रांवर पण अधेमधे नजर टाका म्हणजे रस्त्यांची स्थिती, महागाई, अनधिकृत बांधकामं, गुन्ह्यांचं व विशेषत: महिलांच्या व ज्येष्ठ नागिरकांच्या विरोधातील गुन्ह्याचं वाढतं प्रमाण अशा अनेक बाबी त्यांच्या ध्यानात येतील. जराशा विनोदी अंगानं, बोलता बोलता जमलंच तर... तुमच्याकडे गृहखातंही आहे अशी आठवणपण करून द्या त्यांना. काय आहे सणासुदीच्या काळात इतकी धामधूम असते की विसरायला होतात काही गोष्टी...

Web Title: Kapil Sharma to get complaints from the public, do not please the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.