कपिलदेवने खेळाडूंना विश्वास दिला, राजदीप सरदेसाई यांच्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 05:53 AM2017-10-24T05:53:51+5:302017-10-24T05:58:11+5:30
मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं.
मुंबई : क्रिकेट केवळ मोठ्या शहरांतील खेळाडूंसाठी मर्यादित नसल्याची मानसिकता सर्वप्रथम बदलली ती कपिलदेवने. कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना मोठा विश्वास दिला की भारतासाठी क्रिकेट कोणीही खेळू शकतं. पूर्वी देशातील छोट्या शहरांतून अनेक खेळाडू आले, पण त्यांना आपली छाप पाडता आली नाही. कपिलने मात्र सर्व चित्रच बदलून टाकत भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवली, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी मांडले.
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी क्रिकेटवर लिहिलेल्या ‘डेमोक्रॉसी ईलेव्हन’ पुस्तकाचे भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांच्या हस्ते सोमवारी मुंबईत प्रकाशन करण्यात आले.
या वेळी माधव आपटे, नरी कॉन्टेÑक्टर, अजित वाडेकर, सुनील गावसकर, मोहम्मद अझरुद्दिन, सचिन तेंडुलकर आणि दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या पत्नी नंदिनी आणि क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन सोहळा पार पाडला.
या वेळी हर्षा भोगले, गावसकर, तेंडुलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी जुन्या आठवणी, आधुनिक क्रिकेट आणि खेळाडूंची बदललेली मानसिकता यावर चर्चा करत कार्यक्रमात रंग भरले.
गावसकर म्हणाले की, ‘कपिलने लहान शहरांतील खेळाडूंना उच्च दर्जाचे क्रिकेट खेळण्याचा विश्वास दिला. त्याआधी मेट्रो शहरातील खेळाडू आपले वर्चस्व गाजवत होते. पण कपिलने हे चित्र बदलले. आज भारताची वेगवान गोलंदाजी उच्च दर्जाची झाली आहे आणि माझ्या मते याचे सर्व श्रेय कपिलला जाते. कपिलचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अतुलनीय आहे.’
त्याचप्रमाणे आज क्रिकेटमध्ये तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जात आहे. याविषयी सचिन म्हणाला की, ‘नक्कीच आज तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आले आहे आणि हे सर्व आयपीएलमुळे झाले आहे.
आज भारतीय संघ समतोल दिसत आहे. गोलंदाजदेखील चांगली फलंदाजी करताना दिसतात,
जे भारतासाठी खूप चांगले आहे. हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूंमुळे भारतीय संघाला अधिक बळकटी येत आहे.’
>भारतीय संघात आल्यापासून विराट कोहलीच्या स्वभावामध्ये बदल झालेला नाही. मी त्याच्यातील जोश बघितला असून अनेकांना त्याचा जोश पसंत नव्हता. तसेच, अनेक जण त्याच्यावर टीकाही करत होते. मात्र, आज हाच जोश भारतीय संघाची मजबूत बाजू बनला आहे. कोहलीमध्ये फारसा बदल झाला नाही, मात्र त्याच्या आजूबाजूचे लोक नक्कीच बदलले. माझ्या मते एक खेळाडू म्हणून स्वत:ला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे.
- सचिन तेंडुलकर