कऱ्हाडला कमळ फुलविण्याचा घाट!

By admin | Published: November 26, 2014 11:16 PM2014-11-26T23:16:02+5:302014-11-27T00:11:15+5:30

नुसते पुढे नेऊ नका, तर बरोबर घ्या ! --सदाभाऊ अलिप्तच !

Karhad lotus bloom! | कऱ्हाडला कमळ फुलविण्याचा घाट!

कऱ्हाडला कमळ फुलविण्याचा घाट!

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची मंगळवारी पुण्यतिथी झाली़ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यभरातील नेत्यांबरोबर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यशवंतरावांच्या प्रीतिसंगमावरील स्मृतिस्थळी नतमस्तक झाले खरे; परंतु याच कऱ्हाडात भाजपच्या तीन लाख सदस्य नोंदणीचा नारळही त्यांनी फोडला. आजपावेतो, काँगे्रस संस्कृतीत रमलेल्या कऱ्हाडच्या घाटावर कमळं फुलविण्याचा घाटही याच देवेंद्रपंतांच्या पक्षानं घातलाय़
कऱ्हाडच्या राजकीय पंढरीत प्रत्येक वर्षी २५ नोव्हेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मेळा भरतो़ कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करून ही मंडळी नवी प्रेरणा घेऊन कामाला लागतात़ यंदाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि यशवंतरावांचे मानसपुत्र शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, डॉ़ पतंगराव कदम, रामराजे नाईक - निंबाळकर यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मान्यवरांनी सकाळी सकाळीच स्मृतिस्थळाला अभिवादन करून स्फूर्ती घेतली़ दुपारी साडेबारा वाजता राज्यातील भाजप सरकारचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमान लँड झाले, अन् त्यांच्याबरोबर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिलीप येळगावकर, पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ भरत पाटील, डॉ़ अतुल भोसले व पदाधिकाऱ्यांचा ताफा स्मृतिस्थळावर पोहोचला़ एरव्ही काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गजबजणारा हा परिसर भाजप कार्यकर्त्यांनी फुलला.
त्यानंतर भाजपने उभारलेल्या सभासद नोंदणी कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि जिल्हाध्यक्ष पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांनी जिल्ह्यात तीन लाख सभासद नोंदणी करण्याचा संकल्प सोडला़ या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्यावर मदार ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले़ विमानतळावर आल्यापासून मुख्यमंत्री परत जाईपर्यंत पाटील सावलीप्रमाणे त्यांच्या बरोबरच होते़

सदाभाऊ अलिप्तच !
मुख्यमंत्री फडणवीस स्मृतिस्थळी असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत प्रीतिसंगमावरच होते; पण मित्रपक्ष असतानाही खोतांनी त्या मेळात न घुसता अलिप्त राहणे पसंत केले़ मुख्यमंत्री गेल्यावर त्यांनी चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन केले़

नुसते पुढे नेऊ नका, तर बरोबर घ्या ! --
प्रीतिसंगमावर मुख्यमंत्री फडणवीस आल्यानंतर त्यांच्यासोबत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व भाजपचे आजी-माजी आमदार होते़ तर त्यांच्या पाठीमागून काही अंतरावर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई चालत होते़ तेव्हा पत्रकारांनी देसार्इंना तुम्ही मागे का? बरोबर का नाही? असे विचारले़ तेव्हा ‘आम्ही सरकारमध्ये बरोबर नाही़,’ असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले़ तर मागून आलेले माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी देसार्इंच्या हातात हात घालून त्यांना फडणवीस यांच्याकडे पुढे स्मृतिस्थळावर नेले़ तेव्हा ‘त्यांना बरोबर घ्या,’ असा चिमटा एकाने काढला़ त्यानंतर विमानतळावर मात्र या दोन मित्रांनी एकमेकांशी संवाद साधला़ हा संवाद कोणत्या विषयावर झाला याबाबत उलटसुलट चर्चा आहे़



भाजपचे पहिलेच मुख्यमंत्री
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडला त्यांच्या स्मृतीला प्रत्येक वर्षी अभिवादन करायला राज्याचे मुख्यमंत्री येतात; पण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे फडणवीस हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत़ राज्यात युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी देखील अभिवादनासाठी उपस्थित राहिले होते़

Web Title: Karhad lotus bloom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.