कोल्हापुरात कर्नाटक पोलिसांचा धिक्कार
By Admin | Published: November 6, 2016 01:13 AM2016-11-06T01:13:27+5:302016-11-06T01:15:17+5:30
बेळगाव येथे काळ्या दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याच्या कारणावरुन कर्नाटक पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांना अटक करून अमानुष मारहाण केली. याच्या निषेधार्थ
कोल्हापूर : बेळगाव येथे काळ्या दिनाच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याच्या कारणावरुन कर्नाटक पोलिसांनी मराठी कार्यकर्त्यांना अटक करून अमानुष मारहाण केली. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे शनिवारी सायंकाळी शिवसेनेतर्फे कर्नाटक पोलिसांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र निदर्शनेही करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने ‘कर्नाटक पोलिसांचा धिक्कार असो,’ ‘कर्नाटक पोलिसांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच सीमाबांधवांवर अमानुष मारहाण करणाऱ्या कानडी सरकारी गुंडांच्या पुतळ्याचे दहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडतर्फेही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सीमाभागातील मराठी समाजावरील अन्याय दूर करावा, ही दडपशाही तत्काळ थांबवावी, मराठी बांधवांमागे संभाजी ब्रिगेड ठामपणे उभे आहे. जर अत्याचार सुरूच ठेवले तर संभाजी ब्रिगेड रस्त्यांवर उतरून याला प्रत्युत्तर देईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष
रूपेश पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)
कर्नाटकच्या बसगाड्यांवर ‘जय महाराष्ट्र’
कोल्हापूर : कर्नाटकमधील बेळगाव येथे कानडी अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने शनिवारी दुपारी कोल्हापूर येथील संभाजीनगर बसस्थानकातील कर्नाटक बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून ‘युवासेने’ने या घटनेचा निषेध नोंदविला.