"कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत, आमचा भाग आम्हाला मिळणारच", देवेंद्र फडणवीसांनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:28 AM2022-11-25T07:28:20+5:302022-11-25T07:29:09+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयापेक्षा कुणीही मोठे नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही किंवा इतर कुणीही न्यायालयापेक्षा मोठे नाही, असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काहीही दावा ठोकला तरी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही आणि आमचा सीमा भाग आम्हाला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातील गावांवर आमचा दावा आजचा नाही. त्यामुळे त्याबाबत मी केलेले वक्तव्य चिथावणीखोर नाही. जे रास्त आहे ती मागणी मी केलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले.
सीमाप्रश्न राज्य निर्मितीपासून सुरू आहे. महाराष्ट्राने सातत्याने यासंदर्भात आपली भूमिका पक्की ठेवली आहे. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्यायालय योग्य भूमिका घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
कर्नाटकची बस अडवून केला निषेध
दौंड (जि. पुणे) : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने शहीद भगतसिंग चौक, दौंड येथे कर्नाटक सरकारची निपाणी-संभाजीनगर बस अडवून कर्नाटक सरकारचा, मुख्यमंत्री बोम्मई यांचा जाहीर निषेध करण्यात आला. निपाणी - संभाजीनगर बस अडवून ड्रायव्हर कंडक्टरला भगवा पंचा घालून व बसवर निषेधाचे फलक लिहून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. कर्नाटक राज्यातील बसचे चालक आणि वाहक तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेला कुठलाही धोका कार्यकर्त्यांनी पोहोचू दिला नाही.
कर्नाटकला एक इंचही जागा जाऊ देणार नाही
कर्नाटकला एक इंचसुद्धा जागा जाऊ देणार नाही. सरकार त्यासाठी समर्थ आहे. मी या प्रश्नावर ४० दिवस कर्नाटकमध्ये तुरुंगवास भोगला आहे. जतचा मुद्दा २०१२ चा आहे. त्यावेळी सरकार कोणाचे होते?
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
काय देता, काय घेता, यावर चर्चा होऊ शकते
कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत; परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल, यावर चर्चा होऊ शकते. काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
‘त्यांच्या अंगात भूत संचारलंय’
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. बोम्मई हे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोलले आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थक
अक्कलकोट, सोलापूरमध्ये शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक राहत आहेत. ते महाराष्ट्राचे भाग आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा निरर्थक आहे. - डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद
४८ खासदारांनी केंद्राचे लक्ष वेधावे...
सीमाप्रश्नावर राज्यातील ४८ खासदारांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवावा. सर्वपक्षीय शिष्टमंडळानेही भेटावे. या लढ्यात राज्य सरकारने ताकदीनं उभं राहायला हवं. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री