कर्नाटक सरकारनं पुन्हा आपली पातळी दाखवली, गुलाबराव पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 06:22 PM2020-08-09T18:22:24+5:302020-08-09T18:24:00+5:30
गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याची टीका केली.
जळगाव : कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा रात्रीतून हटवून पुन्हा एकदा आपली पातळी दाखवून दिली आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू शकतात, मात्र शिवरायांना मनातून कसे काढणार, असा प्रश्न शिवसेनेचे उपनेते तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करीत कर्नाटक सरकार टीका केली.
याचबरोबर, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाबाबत केलेल्या व्यक्तव्याबद्दल गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी असल्याची टीका केली. दरम्यान, नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा पैसा कमावणे हाच धंदा असल्याची टीका भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केली होती.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला. महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद जागोजागी उमटले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, नागपूरसह अनेक ठिकाणी आंदोलने झाली. यावेळी शिवसैनिकांनी भाजपा आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.