...आणि बाळासाहेब ठाकरेंना अटक !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 02:35 PM2022-02-13T14:35:08+5:302022-02-13T14:36:17+5:30
हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली.
संजीव साबडे -
शिवसेनेची १९६६ साली स्थापना झाली, तीच मुळी महाराष्ट्रात मराठी भाषकांवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरही सरकारी व बँकांतील नोकऱ्यांत परप्रांतीयांना प्राधान्य मिळत असल्याने मराठी भाषकांमध्ये संताप होता. शिवाय मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला असला तरी कर्नाटकात गेलेला मराठी भाषक भाग पुन्हा मिळावा, ही मराठी जनतेची आणि शिवसेनेची प्रमुख मागणी होती. सीमा प्रश्न खदखदत होता. सीमा प्रश्न सुटेपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला मुंबई व महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर १९६८ साली परळच्या कामगार मैदानावरून दिला होता; पण शिवसेना हे प्रत्यक्ष करेल, असे कोणाला वाटत नव्हते.
मोरारजी देसाई तेव्हा उपपंतप्रधान होते. त्यांचा मुंबई दौरा जाहीर झाला. मुळात मोरारजीभाईंबद्दल मराठी लोकांत राग होता. ते मराठीद्वेष्टे आहेत, महाराष्ट्राविषयी त्यांच्या मनात अढी आहे, असे सर्वांना वाटत होते. ते ८ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथून कारने दक्षिण मुंबईत येत असताना माहीम चर्चपाशी शिवसैनिकांनी त्यांची कार अडवली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला, त्यात अनेक शिवसैनिक जखमी झाले; पण त्यामुळे वातावरण खूपच तापले. पोलिसांनी बाळासाहेब ठाकरे, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी आदींना अटक केली. ठाकरे यांना झालेली ही पहिली अटक.
हे वृत्त पसरताच हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने सुरू झाली. परप्रांतीयांची हॉटेल्स, दुकाने, तसेच अन्यत्रही दगडफेक सुरू झाली. तिथेही लाठीमार झाला. गोळीबार करण्यात आला. तब्बल ८ दिवस मुंबईत जाळपोळ सुरू राहिली. गोळीबारात ५८ शिवसैनिक मरण पावले, २७४ जखमी झाले आणि १५१ पोलिसांनाही इजा झाली. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुंबई शांत व्हावी म्हणून त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली. बाळासाहेबांनी तुरुंगातून पत्र जारी केले. रस्त्यावर उतरू नका, कायदा हाती घेऊ नका, शांतता पाळा, असे आवाहन बाळासाहेबांनी शिवसैनिकांना केले. त्यांच्या या आवाहनानंतर शिवसैनिक व मुंबई शांत झाली. पुढे ठाकरे व अन्य नेत्यांचीही सुटका झाली. या घटनेनंतर मुंबईवरील शिवसेनेचा प्रभाव व दबाव सर्वांना कळला. शिवसेनाप्रमुख मुंबई बंद करू शकतात, त्यांचे तितके वजन आहे, सेनेची तशी दहशत आहे, हे स्पष्ट झाले. त्याचा पुढील निवडणुकांत शिवसेनेला खूप फायदा झाला.