पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

By admin | Published: June 9, 2015 11:26 PM2015-06-09T23:26:35+5:302015-06-10T00:34:05+5:30

दहावीची फेरपरीक्षा १५ जूनपासून : मुख्य परीक्षेतील नापासांना संधी

Karnataka number one in the supplementary examination | पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

पुरवणी परीक्षेतही कर्नाटक नंबर वन

Next

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर -कर्नाटकात दहावीची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्यात निकालही लागला. नापास विद्यार्थ्यांसाठी १५ ते २२ जून या काळात पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. पुरवणी परीक्षेत पास झाल्यानंतर नियमित विद्यार्थ्यांसोबत पुढील वर्गात बसता येणार आहे. त्यामुळे निकालाबरोबरच पुरवणी परीक्षा घेण्याची कर्नाटक माध्यमिक परीक्षा मंडळाची १४ वर्षांची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने केलेल्या दाव्याप्रमाणे वेळेत निकाल लावून पुरवणी परीक्षा घेण्यातील ‘नंबर वन’ यंदाही राखला आहे.
कर्नाटकात माध्यमिक परीक्षा मंडळाने यंदा दहावीची परीक्षा ३० मार्च ते १३ एप्रिलअखेर घेतली. या परीक्षेला राज्यातून साडेआठ लाख विद्यार्थी बसले होते. निकाल १२ मे रोजी लावला. केवळ ३० दिवसांत निकाल लागला. वेळेत निकाल लागल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. १५ जूनपासून नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन केले आहे. यामुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विस्मृतीत जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
कर्नाटकात विभागनिहाय पेपर तपासणीसाठी तात्पुरती केंदे्र निर्माण केली जातात, हे वेळेत निकाल लागण्याचे महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्रात शिक्षकांना शाळेत उत्तरपत्रिका तपासणीसाठी दिल्या जातात. बहुतांश शिक्षक शाळेत वेळ मिळत नाही म्हणून त्या घरी घेऊन जातात. परिणामी उत्तरपत्रिका तपासणीसाठी विलंब लागतो. निकालही उशिरानेच जाहीर होतो. पारदर्शकता राहत नाही. निकाल जितक्या लवकर जाहीर होईल, तितका अधिक वेळ विद्यार्थी व पालक यांना पुढील करिअरची, अभ्यासक्रमांची दिशा ठरवून शिक्षण संस्था निवडण्यासाठी मिळतो. निकाल काय लागणार यासंबंधी विद्यार्थ्यांचा तणावाचा कालावधी कमी होतो. म्हणून निकाल लवकर लागावा, अशी पालक व विद्यार्थ्यांची अपेक्षा असते.
प्रत्येक वर्षी कर्नाटक आणि महाराष्ट्रात दहावीची परीक्षा सर्वसाधारणपणे एकाच महिन्यात होत असते.
अचूक नियोजनाअभावी महाराष्ट्रात वेळेवर निकाल लागत नाहीत. याउलट कर्नाटक परीक्षा मंडळाच्या प्रशासनाने वेळेत निकाल लावण्यातील आघाडी कायम राखली आहे. कर्नाटक परीक्षा मंडळाचा आदर्श घेऊन, महाराष्ट्रातही आता वेळेत निकाल लावून, पुढील वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षांतील नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नापास विद्यार्थ्यांना वर्ष वाया न घालविता पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

‘लोकमत’वर अभिनंदनाचा वर्षाव...
दहावी, बारावीतील नापास विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकात पुरवणी परीक्षा कशी व केव्हा घेतली जाते, यंत्रणा कशी राबविली जाते, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होतो, याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिद्ध केली. त्यामुळेच महाराष्ट्रातही पुरवणी परीक्षेचा निर्णय झाला. त्याबद्दल ‘लोकमत’चे मंगळवारी दिवसभर अनेकांनी अभिनंदन केले.


बारावीचा ५२ दिवसांत निकाल...
बारावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्यापासून निकाल ५२ दिवसांनंतर यंदा लागला. पदवीपूर्व परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा १२ ते २७ मार्चअखेर घेतली. निकाल १८ मे रोजी जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, या महिनाअखेर परीक्षा घेण्याचे नियोजन आहे, असे परीक्षा मंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

पाच वर्षांतील दहावीचा निकाल टक्केवारीत
वर्षटक्के
२०११७३.९०
२०१२७६.१७
२०१३७७.४७
२०१४८१.१९
२०१५८३.००

Web Title: Karnataka number one in the supplementary examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.