कर्नाळा अभयारण्याला मिळणार संजीवनी

By Admin | Published: June 16, 2015 10:49 PM2015-06-16T22:49:04+5:302015-06-16T22:49:04+5:30

कर्नाळा पक्षी अभयारण्याला नवसंजीवनी देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटींची तरतूद करणार असल्याचे जाहीर केले.

Karnjala Wildlife Sanctuary gets Sanjivani | कर्नाळा अभयारण्याला मिळणार संजीवनी

कर्नाळा अभयारण्याला मिळणार संजीवनी

googlenewsNext

वैभव गायकर, पनवेल
कर्नाळा पक्षी अभयारण्याला नवसंजीवनी देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन कोटींची तरतूद करणार असल्याचे जाहीर केले. सोमवारी मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या देखरेखीखाली कन्सल्टन्ट व वास्तुविशारद यांची नेमणूक करून कामाला गती देण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी मुंबई, ठाण्याबरोबरच महाराष्ट्रातील विविध भागातील पर्यटक येतात. मात्र याठिकाणच्या असुविधेमुळे पर्यटकांचा हिरमोड होतो. पक्ष्यांसाठी ठेवलेले पिंजरे, निसर्ग परिचय केंद्राच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. अभयारण्यात मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, पर्यायाने आजूबाजूच्या रहिवाशांना रोजगाराची संधी मिळेल. त्यामुळे कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंत्र्यांनी सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह बैठकीत जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, वन शिकार प्रतिबंध अधिकारी प्रवीण पाटील, फणसाड सहाय्यक वन संरक्षक सरोज गवस, कर्नाळा वन क्षेत्रपाल एस. के. पवार उपस्थित होते.

पर्यटनाला चालना मिळणार : पक्ष्यांसाठी ठेवलेले पिंजरे, निसर्ग परिचय केंद्राच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे. अभयारण्यात पक्ष्यांची कमतरता, पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था, तुटलेले पिंजरे, भोजन व उपाहारगृहाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, पार्किंग व्यवस्था आदी सुविधा याठिकाणी उपलब्ध झाल्यास पर्यटकांची गर्दी वाढेल, यासंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

Web Title: Karnjala Wildlife Sanctuary gets Sanjivani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.