कराेना व्हायरस ; 18 जानेवारीपूर्वी चीनहून आलेल्या प्रवाशांचाही घेण्यात येणार शाेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:58 PM2020-01-27T19:58:39+5:302020-01-27T19:59:57+5:30
कराेना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून 18 जानेवारी पूर्वी चीनहून आलेल्या प्रवाशांचा देखील शाेध घेण्यात येणार आहे.
पुणे : कराेना व्हायरसने चीनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले असाताना चीनमधून 18 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत मुंबई विमानतळावर आलेल्या 3756 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. यातील 15 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत. आज सार्वजनिक आराेग्य विभागाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत १ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान चीनवरुन भारतात आलेल्या प्रवाशांची देखील तपासणी करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.
आज सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीपकुमार व्यास यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साथरोग चात रूम प्रतिबंध व नियंत्रण तांत्रिक समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत तसेच समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ सुभाष साळुंखे, संचालिका डॉ. अर्चना पाटील आणि डॉ.साधना तायडे हे उपस्थित होते.या बैठकीस एन आय व्ही पुणे येथील तज्ञ तसेच विविध विषयातील विशेषज्ञही हजर होते. या बैठकीत करोना विषाणू उद्रेकाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत करोना उद्रेकासंदर्भात विविध विषयाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे उपगट नेमण्यात आले.
सध्याची विमानतळावरील स्क्रिनिंग ही १८ जानेवारी पासून सुरू झालेली आहे. १ जानेवारी ते १७ जानेवारी या काळात चीनवरून राज्यात आलेल्या प्रवाशांचा नागरी विमान वाहतूक विभागाच्या मदतीने शोध घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संशयित तसेच बाधित रुग्णाला रुग्णालयातुन घरी सोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात आल्या. खाजगी डॉक्टर्स , सर्वसामान्य लोक यांच्यासाठी वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी 104 हेल्पलाईन करोना विषयक मार्गदर्शनासाठी वापरण्याचेही ठरविण्यात आले. करोना उद्रेकासंदर्भात भीतीचे वातावरण तयार न होता प्रभावी तयारी करण्याचा निर्धार या बैठकीत सर्वांनी व्यक्त केला.