करूणा धनंजय मुंडे यांची नव्या शिवशक्ती पक्षाची घोषणा; राज्यातील सर्व निवडणुका लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:19 PM2021-12-23T12:19:07+5:302021-12-23T12:19:28+5:30
Karuna Munde : निवडणूक लढवण्याची वेळ आली तरी आपण परळीमध्येच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली.
अहमदनगर: करुणा धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवशक्ती सेना असं त्यांच्या नव्या पक्षाचं नाव असणार असून हा पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका हा पक्ष लढवणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. तसंच यावेळी त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याची करण्यासाठी काम करणार असल्याचं म्हणत भ्रष्टाचारमुक्त आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात येण्याचं आवाहन केलं.
"महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात. घोटाळ्यामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक-एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपवायचा आहे. त्यासाठी माझा पक्ष काम करेल," अशी घोषणाही मुंडे यांनी केली. भ्रष्टाचार मंत्री करतात आणि अधिकारी, पोलीस अधिकारी बळी दिले जातात, हे मी २५ वर्ष पाहिलेले आहे. त्यामुळे आता हे संपवायचे असल्याचं त्या म्हणाल्या.
३० जानेवारी रोजी अहमदनगर मध्ये एक मोठा मेळावा होईल. त्या मेळाव्यामध्ये पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा, बोधचिन्ह आणि निवडणूक लढवण्या संदर्भातली आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. "भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करणार हे माझे स्वप्न आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्याची माझी इच्छा होती. अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क केला, मात्र त्यांनी भेटीची वेळ दिली नाही. राळेगणसिद्धी येथे सुद्धा त्यांच्या घराबाहेर दोन तास प्रतीक्षा करत थांबले होते. परंतु मला भेट मिळाली नाही, याची खंत वाटते," असेही त्या म्हणाल्या. निवडणूक लढवण्याची वेळ आली तरी परळीमध्येच निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही मुंडे यांनी केली.