Maharashtra Politics: “रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन हटवा”; शिंदे-फडणवीसांकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 07:27 PM2023-02-13T19:27:30+5:302023-02-13T19:28:32+5:30
Maharashtra News: रुपाली चाकणकर पदाचा गैरवापर करत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच केंद्रीय महिला आयोगालाही तक्रार दिली आहे. महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे. रुपाली चाकणकर महिला आयोग पदाचा गैरवापर करत असल्याचेही या पत्रात म्हटले आहे.
रुपाली चाकणकर निष्पक्षपणे काम करत नाहीत
रुपाली चाकणकर त्यांचे काम निष्पक्षपणे करत नाहीत. याशिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसोबत असलेले फोटो त्यांच्या फेसबुक वॉलवर दिसून येत आहेत. तक्रारदार महिला आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो, व्हिडीओ प्रसारित करतात. यामुळे या महिलांची ओळख समाजापुढे येत आहे, असेही या पत्रात म्हटल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, त्याचबरोबर महिला ज्या महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर मिळत नाही. त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि राजकारण करतात. ज्या मोठ्या लोकांच्या तक्रारी त्यांच्याकडे केल्या आहेत त्या व्यक्तिसोबत त्यांचे फोटो आहेत. त्यामुळे लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले. या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"