Maharashtra Politics: “मी वंजारी समाजाची सून, भगवानगडावर दसरा मेळावा पुन्हा सुरु करणार”; आता करुणा शर्मा मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 11:52 PM2022-09-12T23:52:05+5:302022-09-12T23:53:11+5:30
दसरा मेळाव्यावरुन शिवसेना-शिंदे गटात रस्सीखेच सुरू असतानाच करुणा शर्मांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेणार असल्याचा निर्धार केला आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होऊ नये, यासाठी शिंदे गट आणि भाजप प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गट यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असताना दसरा मेळाव्याच्या राजकारणात करुणा शर्मा यांनी उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. मी वंजारी समाजाची सून असून, भगवानगडावर दसरा मेळावा पुन्हा सुरु करणार असल्याचा निर्धार करुणा शर्मा यांनी केला आहे.
मी वंजारी समाजाची सून आहे. मला दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. मी तो घेणारच आहे. दसऱ्याच्या दिवशी माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात माझ्या मुलीलाही सोबत नेणार आहे. यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची भेट घेऊन मेळाव्यासाठीची परवानगी घेणार आहे, अशी माहिती करुणा शर्मा यांनी दिली.
मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे
मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझे नाव घेताच लोक घाबरतात. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे, असे करुणा शर्मा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भगवान गडावरील दसरा मेळाव्याला मोठी परंपरा आहे. भगवान बाबांनी गडावर शस्त्रपूजन करून गडाच्या आजूबाजूच्या गावातील भक्तांनी एकत्र येऊन गडावर दसऱ्याच्या दिवशी उत्सव सुरु केला. पुढे हीच परंपरा महंत भीमसेन महाराजांनी चालवली. भीमसेन महाराजांचे निधन झाल्यानंतर समाजाच्या वतीने गोपीनाथ मुंडेंनी नामदेव शास्त्रींची गडाचे महंत म्हणून घोषणा केली. २०१४ पर्यंत गडावर दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक येत होते. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने राज्यातील दिग्गज या कार्यक्रमाला हजेरी लावत होते. भगवान गडावर एक स्टेज होते, ज्यावरून गोपीनाथ मुंडे भाषण करायचे. ते स्टेज मुंडेंच्या निधनानंतर तोडण्यात आले. गोपीनाथ मुंडेंनंतर इतर कोणालाही या ठिकाणाहून भाषण करण्यास मज्जाव करण्यात आला होता.