नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘कसाबसह लादेन’ची हजेरी

By admin | Published: November 20, 2015 02:33 AM2015-11-20T02:33:29+5:302015-11-20T02:33:29+5:30

पामबीच रोडवरील महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीमध्ये चक्क मुंबई हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला दहशतवादी

'Kasab with laden presence' at Navi Mumbai Municipal Headquarters | नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘कसाबसह लादेन’ची हजेरी

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘कसाबसह लादेन’ची हजेरी

Next

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

पामबीच रोडवरील महापालिका मुख्यालयाच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरील नोंदवहीमध्ये चक्क मुंबई हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला दहशतवादी अजमल कसाब, ओसामा बिन लादेन यांच्या नावाची नोंद आढळून आली आहे. हायअ‍ॅलर्ट असतानाही वाहनांची तपासणी होत नसून प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टरही बंदच आहेत.
पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्येही हायअ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने पामबीच रोडवर २०० कोटी रुपये खर्च करून भव्य मुख्यालय बांधले आहे. गत महिन्यामध्ये मुख्यालय उडविण्याची धमकी पत्राद्वारे महापौर सुधाकर सोनावणे यांना दिली होती. परंतु यानंतरही सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. सुरक्षा वाढविल्याचे लक्षात यावे यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. सुरक्षा व्यवस्थेमधील मनुष्यबळ वाढले असले तरी प्रत्यक्षात मात्र सुरक्षा रामभरोसेच आहे. वाहनांमधून येणाऱ्या साहित्याची तपासणी होत नाही. कोणीही कोणतीही वस्तू आतमध्ये घेवून जात आहे. एखादी वस्तू आतमध्ये घेवून जायचे असेल तर त्या वस्तूची नोंदच होत नाही.
मुख्यालयामध्ये येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते. परंतु या रजिस्टरमध्ये कोणी काय लिहिले हेही पाहिले जात नाही. गुरुवारी दिवसभरात जवळपास ४०० पेक्षा जास्त नागरिकांनी मुख्यालयास भेट दिली आहे. त्यांची नोंद रजिस्टरमध्ये केली आहे. या यादीमध्ये मुंबईमध्ये २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब सव्वाएक वाजता कार्यकारी अभियंता संजय देसाई यांना भेटण्यासाठी आल्याची नोंद झाली आहे. यानंतर १४६ क्रमांकावर अमेरिकेने ठार केलेला दहशतवादी ओसामा बिन लादेनची नोंद झाली आहे. लादेन पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आल्याचे नोंदवहीत नमूद केले आहे. या प्रकारामुळे पालिकेमधील सुरक्षा रक्षक व पोलीस किती निष्काळजीपणे काम करीत आहेत हे स्पष्ट होत आहे. महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त दिनेश वाघमारे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दक्ष नागरिकांनी केली आहे.

पोलीस करतात आराम
मुख्यालयामध्ये बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारीही तैनात केले आहेत. परंतु हे सर्व कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर खुर्च्या टाकून बसत आहेत.
येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. सुरक्षा रक्षक बोर्डाचे कर्मचारी व खाजगी सुरक्षा एजन्सीच्या गार्डवर सर्व जबाबदारी सोपविण्यात आली असून पोलीस दिवसभर आराम करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सामान्यांना त्रास
महापालिकेमध्ये येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात नाही. कोण कशासाठी वाहन घेवून आतमध्ये आले याची नोंदच होत नाही. येथील सुरक्षा रक्षक फक्त पायी चालत येणाऱ्यांची तपासणी करत असल्याचे भासवत आहेत.
वास्तविक कोणत्याच नागरिकाकडील साहित्याची व्यवस्थित पाहणी केली जात नाही. गुरुवारी महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आर. एस. रसनबहिरे हे अनेकांशी उद्धट वागत होते. सुरक्षा रक्षक बोर्डाचे कर्मचारी व मुख्य गेटवरील शिर्के व खराडे हे चांगले काम करत असले तरी एकूण यंत्रणाच ढिसाळ असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे.

चाकू, पिस्तूलही मुख्यालयात : महापालिकेच्या गेटवर व्यवस्थित तपासणी होत नाही. आज चक्क चाकू घेवून दोन व्यक्ती आतमध्ये गेल्या. त्यांची बॅगही तपासली पण चाकू सापडला नाही व मेटल डिटेक्टरचाही काहीच उपयोग झाला नाही. अनेक ठेकेदार व राजकीय पदाधिकारी पिस्तूल घेवून मुख्यालयात येत असतात पण त्याची काहीच माहिती सुरक्षा विभागाकडे नसते.

Web Title: 'Kasab with laden presence' at Navi Mumbai Municipal Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.