‘कासव’गतीने युतीचे संबंध सुधारत आहेत
By admin | Published: April 13, 2017 01:29 AM2017-04-13T01:29:36+5:302017-04-13T01:29:36+5:30
‘व्हेंटिलेटर’वर असलेले शिवसेना-भाजपा युतीचे संबंध ‘कासव’गतीने सुधारत आहेत, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
मुंबई : ‘व्हेंटिलेटर’वर असलेले शिवसेना-भाजपा युतीचे संबंध ‘कासव’गतीने सुधारत आहेत, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
‘कासव’, ‘दशक्रिया’ आणि व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटांनी यंदाच्या ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली. राष्ट्रीय चित्रपट विजेत्या चित्रपटांच्या चमूचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी गौरव करण्यात आला.
यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत काय झाले, शिवसेना-भाजपातील दुरावा दूर झाला का, युती ‘व्हेंटिलेटर’वर आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर, ‘कासव’गतीने युती पूर्वपदावर येत असल्याची मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबतही उद्धव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. फक्त भावना व्यक्त करुन चालणार नाही. यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करुन काही होणार नाही. ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.
पाकिस्तान सतत डोके वर काढत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दात उद्धव यांनी कठोर कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)
- मराठी सिनेमा आणि कलाकारांचा अभिमान वाटतो. जगात कौतुक होत असलेल्या कलाकारांचे घरातही कौतुक व्हायला हवे. त्याच हेतूने या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या अखेरीस शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा उद्धव यांनी केली.