Kasba Bypoll Result : पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला : नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 05:49 PM2023-03-02T17:49:07+5:302023-03-02T17:49:31+5:30

भाजपाच्या सत्ता, पैसा व दहशतीला कसब्याच्या जनतेने चोख उत्तर दिले, पटोले यांचं वक्तव्य.

Kasba Bypoll Result The people of Kasba Peth have taught a lesson to the BJP who committed the sin of killing progressive thought congress leader Nana Patole election result pune | Kasba Bypoll Result : पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला : नाना पटोले

Kasba Bypoll Result : पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपाला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला : नाना पटोले

googlenewsNext

"कसबा पेठ या भाजपाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली २८ वर्ष या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत असे पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपाचा डाव उधळून लावला. पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचे शहर असून माजी राज्यपाल व भाजपाने सातत्याने या विचाराचा अपमान करण्याचे पाप केले, जनतेला हे आवडले नाही म्हणून जनतेने मतपेटीतून भाजपाला जागा दाखवून दिली आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून, फटाके फोडून साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आमदार विकास ठाकरे, आ. वजाहत मिर्झा यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"कसबा पेठ पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पैशाचा वारेमाप वापर करत मते विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली. पैशाच्या जीवावर राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने चोख उत्तर दिले आहे. कसब्याच्या जनतेला भारतीय जनता पक्षाने गृहीत धरले होते पण भाजपाची खरी संस्कृती काय आहे हे या पोटनिवडणुकीत कसबा व महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे. मंत्री व पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करण्यात आल्याचे प्रकार घडले, तडीपार गुंड मंत्र्यांसोबत फिरतानाही लोकांनी पाहिले. पैसे वाटून, दहशत निर्माण करुन निवडणूक जिंकण्याचे भाजपाचे प्रयत्न जनतेने उधळून लावले," असे पटोले यावेळी म्हणाले.

कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह डझनभर मंत्री तळ ठोकून होते. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने सर्व प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. महागाई, बेरोजगारीने त्रस्त जनता व छोटे व्यापारी यांनी भाजपाला धडा शिकवला आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपा कसे करतो याचे दर्शन कसबा पोटनिवडणुकीत जनतेने पाहिले. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा भाजपाची उलटी गिनती सुरु झाल्याचे दर्शवणारा आहे, असे म्हणत रविंद्र धंगेकरांना बहुतमाने निवडून दिले त्याबद्दल कसबा पेठ मतदार संघातील जनतेचे व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नाना पटोले यांनी यावेळी आभार व्यक्त केले. 

ही परिवर्तनाची सुरुवात
तामिळनाडू व पश्चिम बंगालमधील पोटनिव़डणुकीतही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. त्रिपुरामध्ये काँग्रेसचा एकही आमदार नव्हता तेथे पाच मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले, नागालँड विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. देशभरातील निकालात काँग्रेस पक्षाला लोकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे, आगामी काळातील निवडणुकांमध्ये हेच चित्र कायम राहणार असून ही परिवर्तनाची सुरुवात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kasba Bypoll Result The people of Kasba Peth have taught a lesson to the BJP who committed the sin of killing progressive thought congress leader Nana Patole election result pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.