काश्मीर पेटतेय; मोदी विदेशात ढोल पिटतात
By admin | Published: July 15, 2016 12:28 AM2016-07-15T00:28:44+5:302016-07-15T00:28:44+5:30
इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे
आळंदी : इकडे काश्मीरमध्ये हिंसाचार बोकाळत निष्पाप लोकांचे जीव जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे टांझानियात ढोल वाजवत होते. ही खेदाची व लाजिरवाणी बाब आहे. इतर देशांचे नेते विदेश दौऱ्यावर असताना अशी घटना घडल्यास तत्काळ देशात दाखल होतात, तर आपले पंतप्रधान काश्मीर पेटत असताना विदेशात ढोल पिटत होते, अशी परखड टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य दिग्विजयसिंह यांनी येथे केली.
पुणे जिल्ह्यातील आळंदी (ता. खेड) येथे माउलींचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
दिग्विजय सिंह म्हणाले, की गंगा स्वच्छतेचे श्रेय घेऊ पाहत असलेले भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. मुळात गंगा स्वच्छतेचा कार्यक्रम काँग्रेस सत्तेवर असताना घेतला गेला आहे. सालाबादप्रमाणे माउली दर्शनासाठी आज गुरुवारीदेखील सिंह पत्नी अमृता सिंह यांच्यासमवेत दाखल झाले. त्यांचा नगरपालिका चौकात आळंदी शहर काँग्रेस पार्टीतर्फे स्वागत करत पुष्पहार घालून सत्कार केला. तदनंतर ते माऊली मंदिरात दाखल झाले. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस अभिषेक व पूजा करत त्यांनी दर्शन घेतले. यशवंत हाप्पे, संजय उभे, नंदकुमार वडगावकर, संदीप नाईकरे, डॉ. मनोज रांका, बाळासाहेब रावडे, चेतन घुंडरे, योगेश सातपुते, ज्ञानेश्वर शेटे, उमेश रानवडे, अविनाश बोरुंदीया, संजय वडगावकर, ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. (वार्ताहर)