काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य

By admin | Published: August 16, 2015 12:19 AM2015-08-16T00:19:31+5:302015-08-16T00:19:31+5:30

- स्नेहा मोरे, मुंबई येत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

Kashmir problem is impossible to make | काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य

काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य

Next

- स्नेहा मोरे,  मुंबई
येत्या काही वर्षांत काश्मीर प्रश्न मोदी सोडवतील, या भ्रमात राहू नये. आता भविष्यात काश्मीरप्रश्न सुटणे निव्वळ अशक्य असल्याचे परखड मत आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. सत्ताबदल झाल्यानंतर काश्मीरप्रश्न लवकर सुटेल या पोकळ शक्यतेला प्रखर विरोध करीत आता काश्मीर कायम ‘शापित नंदनवन’ राहील, असेही ते म्हणाले.
शिवाजी मंदिर येथे गुरुवारी भाषाप्रभू पु.भा. भावे स्मृती समिती आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी, ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे आणि आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शेषराव मोरे यांची प्रकट मुलाखत पार पडली.
याप्रसंगी, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि द्वारकानाथ संझगिरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकार स्वानंद ओक यांनी दोन्ही दिग्गज साहित्यिकांना बोलते केले. याप्रसंगी, मराठी साहित्याच्या अनुषंगाने जागतिक स्तरावरील समस्या, मराठी साहित्याची सद्य:स्थिती, सावरकरवाद-गांधीवाद या विषयांवर दोन्ही साहित्यिकांनी परखड विचार व्यक्त केले.
सत्ताबदल झाल्यानंतर जातींच्या अस्मिता दिवसेंदिवस डोकं वर काढत आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, आजमितीस जातीसंस्था उरलेली नाही, उरल्या आहेत त्या केवळ जातीय संघटना आहेत. या जातीय संघटनांचा वापर आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जातो आहे. केवळ मतांसाठी जातीचे राजकारण सुरू आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांत जनगणनेत ‘जाती’ची नोंद व्हावी, अशी चुकीची मागणी करण्यात येत आहे. तर सदानंद मोरे यांनी जातीसंस्था आता नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विचारांमध्ये बदल आणि भेदाभेद टाळण्याची गरज असल्याचे सांगितले.
भारताने पुढील ५० वर्षांच्या वाटचालीत गांधींच्या मार्गाने जावे की सावरकरांच्या विचाराने यावर उत्तर देताना सदानंद मोरे म्हणाले की, गांधीवाद कोणत्याच राजकारण्यांना परवडण्यासारखा नाही. खुद्द नेहरूंनीही त्यापासून फारकत घेतली होती; आणि काँग्रेसवाल्यांनाही गांधीजींचे विचार कधीच पटले नाहीत.
तर शेषराव मोरे म्हणाले की, गांधीवाद आणि सावरकरवाद आचरणात आणताना हा ‘वाद’ समजून घेतला पाहिजे. सावरकरांचे विचार अत्यंत आधुनिक होते, त्यांनी समाज हा केवळ बुद्धीवर घडतो धर्मावर नव्हे, असे सांगितले. गांधींनी समाज घडविताना धर्माचा आधार घेतला, असे मत शेषराव मोरे यांनी मांडले. सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ला संकुचित मानणाऱ्यांना सावरकर कधी कळलेच नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फाळणी,
हिंदू-मुस्लीम
या मुद्द्यांपासून साहित्यिक अलिप्त
साहित्य समाजाला दिशा दाखविते असे म्हणतात. मात्र मराठी साहित्यात भारताची फाळणी असो वा हिंदू-मुस्लीम प्रश्न याबद्दल लिखाण झाले नाही, या प्रश्नाला उत्तर देताना शेषराव मोरे म्हणाले की, देशाच्या समस्या आणि प्रश्न साहित्यनिर्मितीच्या माध्यमातून सुटणारे नाहीत. अनेक वर्षांपासून आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनातही कधीच या विषयावर परिसंवाद झालेला नाही. हे विषय मराठी साहित्यात टाळले जातात, या विषयांवर लिखाण करायचे नाही हीच साहित्यिकांची भूमिका आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर मराठीतील साहित्यिक केवळ दु:ख व्यक्त करून थांबतात ही शोकांतिका आहे.

‘धार्मिक भावना दुखावू नयेत’
भारतासमोरील तालिबानी, इसिस यांसारख्या समस्यांवर गांधीमार्ग अवलंबला पाहिजे की सावरकरवाद याविषयी मते मांडताना शेषराव मोरे म्हणाले की, यासाठी सावरकरांच्या विचारमार्गाने घटनेत २५ वे कलम अंतर्भूत केले आहे.
त्यामुळे सावरकरांनी अल्पसंख्याक समाजाला कधीच अंतर दिले नाही. तर धर्माविषयी कायदा करण्याचा शासनाला विचार का करावा लागतो? अशी परखड भूमिका मांडली.
शासनच याविषयी तोडगा काढू शकते. त्यामुळे या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार भक्कम असले पाहिजे, असेही ते म्हणाले. तर
सदानंद मोरे यांनी घटनेत धर्माला स्थान आहे, त्यामुळे या समस्यांना तोंड देताना सामान्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचा विचार करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

Web Title: Kashmir problem is impossible to make

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.