काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहात येईल
By admin | Published: February 26, 2017 12:33 AM2017-02-26T00:33:49+5:302017-02-26T00:33:49+5:30
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला
पुणे : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला यश मिळत आहे. त्यामुळे काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूह शह, फलोत्पादन विभागाचे संचालक महंमद हसन मीर, संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, सरहदचे संजय नहार आणि शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.
रमेश म्हणाले, ‘काश्मीरमधील अशांततेचे वातावरण निवळून शांती आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. दहावी अनुत्तीर्णांना प्रशिक्षण आणि रोजगार देणारी ‘हिमायत’, काश्मीरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’ या योजना सुरु केल्या होत्या. हे करताना घटनात्मक जबाबदारी पूर्ण करत असल्याची भावना सरकारमध्ये होती. राज्य सरकारच्या पर्यटन विभागानेही सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करण्यासाठी रोड शो सुरु केले आहेत. परंतु, सगळे काम सरकार करु शकणार नाही. त्यासाठी सरहदसारख्या संस्थांचे योगदान महत्वाचे आहे.’
‘गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. पूर्वी काश्मीरला गेल्यावर गुजराती आणि बंगाली ऐकायला मिळायचे. मात्र, आता मराठी बोलणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. हे पाहून खूप आनंद होतो’, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
दमादम मस्त कलंदर...
काश्मीरमधील लोकप्रिय गायक शफी सोपोरी आणि शमीमा अख्तर यांनी काश्मिरी, हिंदी गीतांसह सुफी रचना सादर करून महोत्सवाची शान वाढवली. ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या हिंदी गीतांसह ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्यांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद दिली.