धुळीत हरवला ‘कात्रज बायपास’
By admin | Published: January 20, 2017 12:41 AM2017-01-20T00:41:11+5:302017-01-20T00:41:11+5:30
कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला
पिसोळी : महापालिका हद्दीलगतच्या गावातून जाणारा कात्रज बायपास सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला आहे. खडीमशीन चौकाच्या बाजूने होत असलेले रस्त्याच्या एकबाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला उर्वरित एका बाजूचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
जुलै २०१६ मध्ये खडी मशीन चौक ते मंतरवाडीपर्यंतच्या कात्रज बायपासचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कामाचा मुहूर्त फार उशिरा लागला. काम जलदगतीने सुरुवात होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात झाले उलटेच, काम सुरू होऊन अडीच महिने होऊनही आजपर्यंत केवळ दीड दोन किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण झाला आहे.
तसेच रस्त्याच्या ज्या एका बाजूने वाहतूक होत आहे, त्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे जड वाहतूक करण्याऱ्या वाहनांचा वेग मंदावतो.
पडलेल्या खड्ड्यांतून प्रचंड प्रमाणात धूळ उडते, ज्यामुळे बायपासच्या आजूबाजूचे रहिवासी, व्यावसायिक त्रस्त आहेत. बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांवर, घरांवर, फलकांवर धुळीचे थर साचले आहेत.
तसेच हा रस्ता व त्याची देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने रस्ता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात आहे, त्यांना मूग गिळून गप्प बसावे लागत आहे. मागे एका ग्रामपंचायतच्या वतीने रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारांच्या नावाचे फलकच बायपास रस्त्यावर लावले होते. (वार्ताहर)
>बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सिमेंट काँक्रिटीकरण चालू असलेल्या बाजूला आता उशिरा साइड रोड बनविण्याचे काम चालू केले आहे, ज्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरण झालेला भागही वाहतुकीस खुला करता येणार नाही. तसेच सिमेंट काँक्रिटीकरण न केलेल्या भागावर खड्डे बुजविण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. या सर्वाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.