विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य जपणारी कातुर्लीची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:43+5:30
१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सहा दशकांपूर्वी पवनी पंचायत समिती अंतर्गत स्थापित करण्यात आलेली कातुर्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावासाठी शान ठरली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रूजविणारी शाळा म्हणून ओळखली जात आहे. मुलांची शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सहकार्य यासह शिक्षकांचे प्रयत्न नावारुपास येत आहे.
१९६० मध्ये कातुर्ली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. १७ विद्यार्थी या शाळेत दाखल झाले. आजघडीला या शाळेची पटसंख्या ७१ इतकी आहे. आधुनिकतेच्या युगात व कॉन्व्हेंट संस्कृतीतही या शाळेने पत राखली आहे. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत. भौतिक सुविधेवर काम करून शाळा स्वच्छ आणि सुंदर बनविण्यात आली आहे. शाळेतील आतील व बाहेरील भागात पेव्हर ब्लॉक सबमर्सीबल स्वच्छता गृह आदी कामे करण्यात आली आहेत. याशिवाय नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना बेसीक नॉलेज, रोज एक वर्ग एक म्हण, बचत बँक, शैक्षणिक साहित्य स्टॉल यासह स्नेहसंमेलन, जयंती उपक्रम आदी कार्यक्रम घेतले जात आहेत.
शाळेची भौतीक स्थिती आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी चंग बांधला आहे. यात पालकांच्या सहकार्याने तो बदल घडवून आणला. शिस्त, मूल्य यांची घडण विद्यार्थ्यांमध्ये देण्यास ही शाळा यशस्वी ठरली आहे.
५२ हजारांची लोकवर्गणी
शाळेत विविध कामे करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणी गोळा करण्याचे कार्य हाती घेण्यात आले. या अंतर्गत जवळपास ५२ हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली आहे. यात शाळा, रंगरंगोटी, स्वच्छता करणे यासह आदी कामे केली जात आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या या कामात विद्यार्थ्यांचेही महत्वपूर्ण योगदान आहे. शिस्त व अनुशासन यांचे पालन नित्यनियमाने केले जात आहे.
शाळेत भौतीक बदल घडवून आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीसह सर्वांचेच सहकार्य लाभत आहे.
-अशोक तिडके, मुख्याध्यापक
शिक्षकांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ झाली आहे. यासह गटशिक्षणाधिकारी एन.टी. टिचकुले व केंद्रप्रमुख बी.आर. मेश्राम यांचेही सहकार्य आहे.
-खुशाल शहारे, अध्यक्ष शा.समिती