दरवर्षी खचतोय काटवली घाट
By admin | Published: July 8, 2017 08:46 PM2017-07-08T20:46:23+5:302017-07-08T20:46:23+5:30
जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते
Next
>ऑनलाइन लोकमत
रस्ता समस्यांच्या गर्तेत : दगड, मुरुम टाकून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी
पाचगणी (सातारा), दि. 8 - जागतिक दर्जाच्या पाचगणीला पसरणी घाटातून जाता येते. या मार्गाला पर्याय म्हणून काटवली घाटाकडे पाहिलं जाते. परंतु, काटवली घाट सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. गणेश पेठ, रुईघर येथील एका शाळेजवळचा रस्ता दरवर्षी सातत्याने खचत आहे. घाटातील खचणारा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत असल्याने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याऐवजी प्रत्येकवेळी दगड, मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जातेय.
जावळी तालुक्यातील कुडाळ, करहर परिसरातील ग्रामस्थांना पाचगणीला जाण्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने काटवली हा एकमेव मुख्य घाट मार्ग आहे. तरीही त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा धनदांडग्यांनी जमीनी खरेदी करून ठेवल्या आहेत. त्यातील अनेकांनी रस्त्याच्या मुख्य संरक्षण भिंतीवर ताबा मिळवीत अवैधरित्या तटभिंत उभारल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या घाटाची दूरवस्था झाली आहे. गटारे मुजून गेली आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास पाण्याचं लोट रस्त्यावर येतात. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास येऊनही बांधकाम विभाग जाणीवपूर्वक याकडे दूर्लक्षच करीत आहे, असा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.
अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक अवैध बांधकामे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेने झाली आहेत. यात प्रामुख्याने खालच्या बाजूस असणाºया संरक्षण भिंतीच काबीज केल्याने काही ठिकाणी संरक्षण कठडे आहेत की नाहीत अशा प्रश्न निर्माण होत आहे. एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेने तर या संरक्षण भिंतीवरच स्वत:ची तटभिंत केली आहे. शाळेचे प्रवेशद्वारही रस्त्याच्या हद्दीत केल्याने त्या ठिकाणी शाळेच्या गाड्या रस्त्यावरच उभ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. हे सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही अधिकारी गप्प का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.
घाटातील रस्त्याकडेच्या अवैध बांधकामुळे भविष्यात तो आणखी अअरुंद होऊन घाट रस्ता मोकळा श्वास घेणार नाही. अनेक ठिकाणी घाटरस्ता खचला आहे. त्यावर मलमपट्टी केली जाते. एका ठिकाणी तर रस्ता सतत खचत चालला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला दिसत असूनही दरवर्षी भर टाकली जात आहे आणि टाकलेली भर खचत आहे तर ती भर का खचत आहे हे पाहणे गरजेचे आहे.
... तर वाहतूक ठप्प
त्या ठिकाणी भिंतच खचली आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात घाट रस्ता पूर्ण बंद होऊ शकतो. कुडाळ, करहर परिसरातील कामकरी लोकांचा पांचगणी सतत संपर्क येतो. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.