‘पॅरेंटिंग प्लॅन’मधून वाचणार कोवळे बालपण
By Admin | Published: June 9, 2015 06:08 AM2015-06-09T06:08:34+5:302015-06-09T06:08:34+5:30
मुलांचे कोवळे बालपण वाचविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कौटुंबिक न्यायालयांना ‘पॅरेंटिंग प्लॅन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हिनाकौसर खान-पिंजार, पुणे
न्यायालयात आई-वडिलांचा घटस्फोटासाठी अर्ज गेला, की मुलांच्या ताब्याचा प्रश्न उपस्थित होतोच. घटस्फोटापेक्षा ही मुले कोणाकडे राहणार, यासाठी होणारी रस्सीखेच मुलांच्या मनावर ताण निर्माण करू लागते. परिणामी मुलांमध्ये आपण कोणालाच नको, अशी असुरक्षितेची भावना बळावू लागते. घटस्फोट पती-पत्नींमध्ये होणार असला, तरी आई-वडील म्हणून त्याचा दूरगामी परिणाम मुलांवर होतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन मुलांचे कोवळे बालपण वाचविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील कौटुंबिक न्यायालयांना ‘पॅरेंटिंग प्लॅन राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळावा म्हणून दाखल होणाऱ्या खटल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पती-पत्नींतील वादांबरोबरच मुलाचा ताबा आपल्यालाच मिळावा म्हणून भांडणाऱ्या आई-वडिलांच्या खटल्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पालकांचा घटस्फोट ही बाबच मुलांसाठी अवघड असते. त्यातच त्यांचा ताबा कोणाकडे राहणार, यावरून पालक मुलांचा विचार न करता भांडभांड भांडत असतात. आई-वडिलांचा घटस्फोट पचविणे आणि त्यातूनच आपण कोणा एकाकडेच राहायला जाणे या दोन्ही गोष्टी हाताळणे नकळत्या मुलांसाठी अतिशय अवघड असते. त्यामुळे मुलांना समजून घेणाऱ्या या पॅरेंटिंग प्लॅनची कल्पना अस्तित्वात आली. मात्र, अद्याप राज्यातील बहुतांश पक्षकार या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. परदेशात मात्र अशा प्रकारचे पॅरेंटिंग प्लॅन मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. (प्रतिनिधी)
काय आहे हा पॅरेंटिंग प्लॅन
मुलांच्या भविष्यासाठी दोन्ही पालकांनी एकत्र यायचे. दोघांनी सामंजस्याने एकत्रित येऊन आपसातील वाद बाजूला ठेवून मुलांचा ताबा कधी कोणाकडे असेल, त्यांच्या देखभालीचा, आरोग्याचा, विम्याचा खर्च कोण करणार आहे याची जबाबदारी, अशा सर्व बाबींवर व्यवस्थित चर्चा करून एक आराखडा आखायचा. त्यानंतर उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या विहित नमुन्यानुसार हा पॅरेंटिंग प्लॅन न्यायालयापुढे दाखल करू शकतात. दाम्पत्यांनी सामंजस्याने आणि आपापली जबाबदारी घेऊन दोघांनी सादर केलेल्या प्लॅनचा न्यायालय अभ्यास करून मंजुरी देईल. सादर केलेल्या प्लॅनमधील बाबींचे पालन करण्याचे बंधन दोघांवर असते.
प्लॅनचे साध्य काय?
मुळात आई-वडिलांमध्ये सुरू असलेल्या वादाचा परिणाम मुलांवर होऊ नये तसेच मुलांचे हक्क अबाधित राहावेत, त्यांना दोघांकडूनही प्रेम मिळावे. मुख्य म्हणजे आपण सुरक्षित आहोत, आपली काळजी घेतली जाते, अशी भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी पॅरेंटिंग प्लॅन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.