कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस

By Admin | Published: March 8, 2017 08:40 AM2017-03-08T08:40:48+5:302017-03-08T08:40:48+5:30

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत कविता हिने गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.

Kavita Raut - Savarpada Express | कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस

कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस

googlenewsNext

ऑनलाइऩ लोकमत 

सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाणारी कविता राऊत. लांब पल्ल्याची भारताची धावपटू. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत कविता हिने गेल्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती. रियोत ती धावली मात्र यश पदरी आले नाही. पण नाशिकच्या ग्रामीण टापूतून आलेल्या या मुलीची धाव आकांक्षांचे परिमाण बनली. कविता राऊत हिने २०१० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. 

 
सावरपाडा हे गाव तसे कुणाच्या खिजगणतीत नसलेले खेडे. मात्र कविता राऊत हिने आपल्या धावण्याने जगाचे लक्ष वेधले आणि गावाचे नाव जागोजागी झळकले. शाळेत शिकत असताना कविता धावण्याच्या स्पर्धेसाठी नाशिकला आली. अनवाणीच धावली. विजय मिळाला नसला तरी पूर्वतयारी नसताना झालेली तिची कामगिरी प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या नजरेत भरली. त्यांनी कविताची प्रतिभा ओळखली आणि मग सुरू झाला तो कविता राऊत हिचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास. कविताने १२ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेतून रियो स्पर्धेचे तिकीट मिळवले होते. कविताने अर्धमॅरेथॉनमध्ये १ तास १२ मिनिटे ५० सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला आहे. त्यासोबतच १०००० मीटर अंतराच्या स्पर्धेत ३४ मिनिटे ३२ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवली आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदक मिळवणारी पहिली महिला अ‍ॅथलीट ठरली होती. २०१० मध्ये १० हजार मीटरच्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याच वर्षी आशियाई स्पर्धेत १० हजार मीटरमध्ये तीने रौप्य पदक पटकावले होते. तिला २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील गौरवले आहे. 
 
एका जिद्दीचा प्रवास काय असतो, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कविता राऊत. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या कवितासाठी विक्रम नवे नाहीत. पण याच कविताकडे एकेकाळी पायात घालण्यासाठी साधे बूटही नव्हते. डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन काट्याकुट्यांचे, खाचखळगे आणि डोंगरमाथे ती तुडवत होती. याच ‘रॉ टॅलण्ट’मधून आंतरराष्ट्रीय ख्यातीची धावपटू निर्माण झाली. असं की आजही ती अंतर्बाह्य साधीभोळी, शिकण्यासाठी आसुसलेली आणि पाय जमिनीवर ठेवून ‘वाऱ्याच्या वेगात पळणारी’ मुलगी आहे. बघता बघता भारतीय तरुणाईची ती आयकॉन कधी झाली हे तिलाही कळलं नसेल.
 
कविताचा सावरपाडा एक्सप्रेस बनण्याचा प्रवास खडतर होता. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करत योग्य प्रशिक्षण, हजारो तासांचा सराव हा जिद्दीने पूर्ण करत तिने यश मिळवले. कविता सध्या नाशिकलाच पुढील स्पर्धांचा सराव करत आहे. 

Web Title: Kavita Raut - Savarpada Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.