कविताला ‘क्लास वन’ अधिकारीपदच हवे!
By admin | Published: November 8, 2016 04:37 AM2016-11-08T04:37:02+5:302016-11-08T04:37:02+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर सेवेत घेण्याची घोषणा केल्यानंतर शासनाने
नाशिक : रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर सेवेत घेण्याची घोषणा केल्यानंतर शासनाने वर्ग तीन पदावर आदिवासी विभागात नोकरी दिल्याने त्याचा निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या राज्यातील आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यामध्ये नाशिकच्या कविताचाही समावेश करण्यात येऊन तिला आदिवासी विकास विभागात नोकरी देण्यात आली. मात्र वर्ग तीन पदावर नियुक्ती देण्यात आल्याने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी
मागणी कविताने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियुक्ती देताना शैक्षणिक पात्रतेच्या निकषाकडे दुर्लक्ष केल्याचा आक्षेपही कविताने नोंदविल्याचे समजते.
मुख्यमंत्र्यांनी आॅलिम्पियन खेळाडूंना ‘क्लास वन’ पदावर नियुक्ती दिली जाईल, असे जाहीर केल्यानंतरही मला वर्ग तीन पदावर नियुक्त करण्यात आले. वास्तविक अन्य एका आॅलिम्पियनला मात्र वर्ग-१ पदावर नियुक्ती देण्यात आल्याचे कविताने निदर्शनास आणून दिले आहे. खेळाडूंना नोकरीमध्ये सामावून घेताना त्यांची शैक्षणिक अट शिथिल करण्यात यावी, असा निकष आहे. कविता पुढील वर्षी पदवीप्राप्त करणार असल्याने शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देणे अपेक्षित असल्याचे कविताने म्हटले आहे. कविता सध्या ‘ओएनजीसी’मध्ये एक्झिक्युटिव्ह एच.आर. या पदावर कार्यरत आहे. (प्रतिनिधी)