खेकडयांची मावशी - शिक्षण पहिली मात्र वर्षाला पाच कोटींची उलाढाल
By admin | Published: July 19, 2016 05:41 PM2016-07-19T17:41:48+5:302016-07-19T17:49:53+5:30
नवी मुंबईतल्या वाशी गावात राहणाऱ्या गुणाबाई सुतार. शिक्षण जेमतेम पहिली. वय ६५. आज त्यांचा व्यवसाय वर्षाला कोट्यवधींची उलाढाल करतो. त्यांना भेटा, उत्साह आणि जिद्दीची एक भन्नाट गोष्ट कळेल!
- भक्ती सोमण
नवी मुंबईतल्या वाशी गावात राहणाऱ्या गुणाबाई सुतार. शिक्षण जेमतेम पहिली. वय ६५. आज त्यांचा व्यवसाय वर्षाला कोट्यवधींची उलाढाल करतो. त्यांना भेटा, उत्साह आणि जिद्दीची एक भन्नाट गोष्ट कळेल!
नाव - गुणाबाई सुतार
वय - ६५ वर्षे
शिक्षण - १ ली पास
व्यवसाय - खेकडे निर्यातीचा
उलाढाल - वर्षाला पाच कोटी
***
ही सारी माहिती वाचून आपण काय वाचतोय, यावर पटकन विश्वास नसेल ना बसला?
पण ते खरंय. गुणाबाई नवी मुंबईतल्या वाशी गावात राहतात. वाशी आणि आसपासच्या परिसरात त्या आणि त्यांचे अडीच, पावणेतीन किलोंचे खेकडे खूपच लोकप्रिय आहेत. केवळ खेकड्यांच्या जिवावर मोठी मजल मारणाऱ्या गुणाबार्इंविषयी जाणून घेण्याची म्हणूनच उत्सुकता वाढते. त्याच उत्सुकतेने गुणाबार्इंना भेटायला गेले तेव्हा त्यांनी स्वत:विषयी सांगण्याला महत्त्व देण्यापेक्षा मी सध्या काय काम करते ते बघ सांगून थेट तलावावरच नेलं.
घराजवळ असलेल्या तलावावर चार माणसे जाळी लावून बसली होती. गुणाबाई त्या जाळीपाशीच पोहोचल्या आणि जाळीत काय लागलंय त्याची पाहणी करून मासे आणि जाळीतले खेकडे पकडताना त्यांच्यात जणू उत्साहच संचारला होता. मासे वेगळे केले आणि पकडलेले खेकडे परत त्या तलावातच सोडून दिले.
आणखी एका जाळीत एक मोठ्ठा खेकडा दिसला. त्यांनी लगेच तो खेकडा हातात धरून त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा तो त्याच तलावात टाकला. हे काय चाललं आहे या उत्सुकतेनं आपण काही विचारणार एवढ्यात त्याच म्हणाल्या, की हे खेकडे आता १०-१५ दिवसात चांगले मोठ्ठे, खाण्यायोग्य होतील. तेव्हा त्यांना बाहेर काढायचं. एकीकडे माझ्याशी बोलताना त्या कामगारांना आणि मुलगा सुभाषला सूचना देत होत्याच. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांच्यातला उत्साह पाहण्यासारखा होता.
या उत्साहात त्यांनी एवढी वर्षं केलेली अपार मेहनतच जास्त आहे. गुणाबार्इंच्या माहेरी आणि नंतर सासरीही परंपरागत मासेमारीचा व्यवसाय. जेव्हा वाशीला रेल्वे येत नव्हती तेव्हाची वाशी खाडी खूप मोठ्ठी होती. त्या खाडीत वडिलांबरोबर स्वत: उतरून फळीवरून (सायकलसारखं पेडल मारून चालवायची बोट) चिखलात हात घालून बरेच मासे आणि खेकडे पकडायच्या. त्याकाळी त्यांनी खूप कष्ट घेतले. ते मासे पकडून हातहोडीने रात्री अडीच वाजता निघून मानखुर्दला पोहोचायच्या. तिकडून पुढची रेल्वे पकडून दादरला जायच्या. ही त्यांची सुरुवात झाली, मच्छी ट्रेडिंगच्या व्यापारापासून. त्या त्यांचे मासे दादरला विकायच्या कारण तेथे त्यांना भाव जास्त मिळायचा.
आपल्या गावातल्या महिलांनाही असा भाव मिळायला पाहिजे हे ओळखून त्या घरोघरी जाऊन महिलांना भाव जास्त मिळण्याबाबत माहिती द्यायच्या. गुणाबार्इंवरील विश्वासाने अनेक महिला त्यांच्याकडे मासे आणि खेकडे विक्रीसाठी देऊ लागल्या. बरं यात पैशांचा व्यवहारही चोख असायचा. दरम्यानच्या काळात नामदेव सुतार यांच्याबरोबर लग्न झाल्यावरही त्यांच्याकडे असलेल्या या व्यवसायात त्या लक्ष घालू लागल्या. अत्यंत सचोटीच्या व्यवहारामुळे आणि चांगल्या मालामुळे लोकांचा गुणाबार्इंवरील विश्वास आणखी वाढला.
त्या काळात मासे आणि खेकड्यांचा माल त्या मद्रासला विकायच्या. कामामुळे काही एजंट्सशीही त्यांची ओळख झाली. त्यामुळे त्यांचा माल हळूहळू परदेशात जायला सुरुवात झाली होती. दरम्यान, या काळात या बिझनेसमध्ये उतरायचे आहे अशांना त्यांनी शिकवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना तयार करण्याचं कामही त्या करत होत्या.
पण या दरम्यान त्यांच्या पतीचं निधन झालं. पदरात पाच मुलं होती. लहान मुलगा सुभाष तेव्हा दोन वर्षांचा होता. अशा परिस्थितीत खंबीर राहून व्यवसाय पुढे चालू ठेवणं भागच होतं. तसाच त्यांचा व्यवसाय सुरू होता. काही वर्षातच मोठा मुलगा देवचंद यानंही त्यांना व्यवसायात साथ दिली.
९२-९३ च्या दरम्यान त्यांचा व्यवसाय खूपच वाढला. पण व्यवसाय म्हटला की हेवेदावे, एकमेकांचे पाय खेचणे आलेच. त्यातून उभं राहणं, स्वत:ला सिद्ध करणं अत्यंत गरजेचं असतं.
गुणाबार्इंचेही तेच झाले. गुणाबार्इंकडे जे लोक शिकले त्यापैकी काहींनी वाशीतच आपला व्यवसाय सुरू केला. मात्र तो करताना गुणाबार्इंना दगा दिला. त्यांनी खेकडे पुरवणाऱ्या होडीवाल्यांना फितवले. त्याच होडीवाल्यांकडून माल घेऊन ते दुसऱ्यांना विकायचे. त्या जिथे जिथे खेकडे विकायच्या ती अनेक गिऱ्हाईकं या काळात तुटली. दुर्दैवानं त्याच काळात मोठ्या मुलाचं, देवचंदचंही निधन झालं. वैयक्तिक आणि व्यावसायिक स्तरावर गुणाबार्इंना मोठा फटका बसला. पण त्या हार मानून बसल्या नाहीत.
त्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने साथ दिली ती त्यांचा लहान मुलगा सुभाषने. त्यावेळी सुभाषचं शिक्षण सुरू होतं. त्यांनी पुन्हा त्याच वेगाने कामाला सुरुवात केली. या दोघांनी पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा जणू चंगच बांधला. याकाळात त्यांनी कोळंबी साफ करण्याचं कंत्राटही घेतलं. पण भविष्यातल्या गोष्टींचा विचार करता खेकड्यांचा व्यवसाय करणं त्या दोघांना जास्त महत्त्वाचं वाटत होतं. या दोघांनी खेकडे निर्यात करायचं हे ठरवून 'लालचंद एंटरप्रायझेस' ही स्वत:ची कंपनी २०१३ साली स्थापन केली. मासळी-खेकडे निर्यात करण्यासाठी आवश्यक निकष पाळून मरीन प्रॉडक्ट रेग्युरेलटरी अॅथॉरिटीच्या नियमांनुसार हॅण्डलिंग युनिट बसवलं. या ठिकाणी खूप स्वच्छता पाळावी लागते. घराच्याच बाजूला असणाऱ्या या जागेत सुभाषनी खेकडे साफ करण्याचं युनिट बसवून घेतलं. गुणाबार्इंना या कामात सुभाष आणि त्याची पत्नी अरुणानं खूप मदत केली.
गुणाबार्इंचा हा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. पावसाळ्याचे हे चार महिने त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण या काळात मोठ्या प्रमाणात खेकड्यांची पैदास होते. गुणाबाई सध्या सिंगापूर, मलेशिया या देशांना तसेच अनेक मोठ्या हॉटेल्सना थेट खेकडे पुरवतात. दरवर्षी त्या ८० ते ९० टन खेकडे पाठवतात. चांगल्या मालामुळे त्यांच्या खेकड्यांना नेहमीच चांगली मागणी असते. सध्या त्यांच्याकडे प्रत्यक्ष १५ माणसं कामाला आहेत, तर अप्रत्यक्षरीत्या त्या २०० माणसांना रोजगार पुरवतात. गुणाबार्इंचे हे काम बघून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक व्यापारी आपणहून त्यांचा माल विकण्यासाठी गुणाबार्इंकडे पाठवून देतात.
याशिवाय त्या आणि सुभाष खेकडे व्यवसायाचं प्रशिक्षणही देतात. भविष्यात त्यांना खेकड्याच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देणारं स्वत:चं ट्रेनिंग स्कूल सुरू करायचं आहे. याशिवाय अनेक सामाजिक कामातही त्यांचा मोठा हातभार असतो. गुणाबार्इंचं कार्य पाहून त्यांना त्यांच्या समाजानं 'आगरी गौरव' हा पुरस्कारही दिला आहे. गुणाबार्इंचा हा प्रवास ऐकून आपण थक्क तर होतो. जाता जाता लक्षात राहतो तो त्यांचा अत्यंत साधेपणा. व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी न डगमगता ठामपणे उभं राहिलं तर यश आपलंच असतं, हेच त्यांनी दाखवून दिलं आहे.
खेकडे शेतीला पोषक वातावरण
परदेशात मुंबईच्या खेकड्यांना नेहमीच मागणी असते. नैसर्गिकरीत्या खेकड्यांचे उत्पादन नवी मुंबईत जास्त होते. कारण येथे सद्यस्थितीत ४५० तलाव आहेत. या तलावात मत्स्यशेतीबरोबरच खेकड्यांची शेती करण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे येथे मत्स्यशेतीबरोबरच खेकड्यांची शेती करण्यासाठी सरकारनेच मदत करणे खूप गरजेचे आहे. त्याचा फायदा आजच्या तरुण पिढीला या व्यवसायात उतरण्यासाठी होऊ शकतो, असं गुणाबाई नमूद करतात.
रात्र-पहाट भरती-ओहोटी
त्यांचा मुलगा सुभाष व्यवसायात मोठी मदत करत असला तरी आजही गुणाबाई भरती-ओहोटीची वेळ ध्यानात ठेवून रोज सकाळी ४ तास तलावावर जातात. सध्या त्यांच्याकडे १५ जण काम करत आहेत. त्यांच्या कामावर त्यांचे बारीक लक्ष असते. महत्त्वाचे म्हणजे भरतीची वेळ रात्रीची असली तरीही त्या तेथे जाऊन काम करतात.
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)