कायस्थ प्रभू फूड फेस्टिव्हलमध्येच अडकून पडलेत
By admin | Published: July 12, 2017 03:44 AM2017-07-12T03:44:13+5:302017-07-12T03:44:13+5:30
कायस्थांचा इतिहास लेखणी आणि तलवार दोन्ही सांभाळण्याचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कायस्थांचा इतिहास लेखणी आणि तलवार दोन्ही सांभाळण्याचा आहे. कायस्थांचे खाद्यपदार्थ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परंतु अलीकडे केवळ खाद्यसंस्कृती व फूड फेस्टिव्हल यामध्ये आपली ज्ञाती अडकून पडली आहे. कायस्थांच्या खाद्यसंस्कृतीबरोबरच स्वामीनिष्ठेचा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध इतिहास संशोधिका व गडदुर्गाच्या अभ्यासक शिल्पा प्रधान यांनी केले.
सीकेपी संस्था, कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त एका विशेष
कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधान बोलत होत्या. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुर्वेदाचार्य डॉ. भाऊ सुळे, संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे, शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी, परिवहन सभापती संजय पावशे इत्यादी उपस्थित होते.
प्रधान म्हणाल्या, बाजी यांचे आडनाव प्रधान होते. देशपांडे ही त्यांना सनद मिळाली होती. त्या काळी कायस्थ हे प्रभू नावाने ओळखले जात असत म्हणून बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू छत्रपतीकडे चाकर नव्हते तर ते बादलांचे सेनापती होते. एका लढाईत बादल लोकांनी छत्रपतींसाठी मोठा पराक्रम केला होता व तो छत्रपतींच्या कानी गेला. जेव्हा पन्हाळ्याला वेढा पडला तेव्हा पाऊस सुरु झाल्यानंतर हा वेढा सुटेल, असा छत्रपतींचा कयास होता. परंतु साठ हजार सैन्यानिशी आलेल्या मोगलांनी वेढा तसाच ठेवला. त्यानंतर बादलांच्या मदतीने पन्हाळगडावरु न निसटण्याची योजना छत्रपतींनी आखली. त्यावेळी बाजीप्रभूंनी सुमारे एक हजार बादल सैनिकांना बोलावले आणि त्यातील ६०० सैनिकांची निवड छत्रपतींबरोबर निसटण्यासाठी केली. त्यानंतर पन्हाळगड ते विशाळगड असा घोडखिंडीतील प्रवास सुरु झाला. आजही या रस्त्याने जातांना सुमारे सोळा तास लागतात. त्यावेळेस आषाढातील पाऊस, चिखलातून महाराज आणि त्यांच्या मावळयांनी कसे कसे मार्गक्रमण केले हे त्यांनी सांगितले.
छत्रपतींनी पन्हाळयावरुन विशाळगडाचा मार्ग का निवडला, सुखरूप असलेल्या कोकणात ते का गेले नाही याविषयी सांगताना प्रधान म्हणाल्या की, छत्रपतींची दहा लग्ने झाली होती. पन्हाळा ते विशाळगड हा मोरे यांचा मुलुख होता. सर्व मोरे मोगलांचे सेवक होते. छत्रपती कुणबी मराठा होते आणि हे मोरे राव मराठा होते. त्यामुळे त्यांनी छत्रपतींशी जमवून घेतले नाही. परंतु विशाळगडावरील मोऱ्यांनी रोटी बेटीचा व्यवहार करून छत्रपतींशी जमवून घेतले. त्यांची मुलगी छत्रपतींची चौथी पत्नी होती. जावयाचा आदरसत्कार आपली जुनी परंपरा आहे म्हणूनच महाराजांनी विशाळगडाची निवड केली.
>बाजीप्रभूंचे हे शौर्य सांगायला हवे
बाजीप्रभूंबरोबर घोडखिंडीमध्ये अवघे तीनशे मावळे होते. समोर मोगलांचे साडेचार हजार सैनिक होते. आपल्या मावळयांना दहा दहाच्या गटाने विखरु न ठेवत ज्या पध्दतीने बाजीप्रभूंनी मोगलांवर चढाई केली त्यावरु न छत्रपतींसह असंख्य मावळे घोडखिंडीतच आहेत, असा मोगलांचा समज झाला. जेव्हा प्रत्यक्ष मोगल सैन्य समोरासमोर आले तेव्हा आपल्या दांडपट्ट्याने अनेक मोगल सैनिकांना बाजीप्रभूंनी कापून काढले. प्रचंड शक्तीचा हा सेनापती सहजासहजी आपल्या हाती पडणार नाही हे ओळखून मोगल सैनिकांनी आणखी कुमक मागवली आणि डोंगरावरुन चारही बाजूकडून बाजीप्रभूंवर ठासणीच्या बंदुकीने हल्ले चढवले यात बाजीप्रभूंचा डावा हात कोपरापासून निखळला. तरीही त्यांनी उजव्या हाताने दांडपट्टा सुरु च ठेवला होता. अखेर बाजीप्रभू धारातिर्थी पडले. तत्पूर्वी छत्रपती सुखरु प पोहचल्याची खबर गुप्तहेरांकडून बाजीप्रभूंना समजली होती. आपला हेतू साध्य झाला याचे त्यांना समाधान वाटले. मराठा सैन्याला जंगलात पळून जाण्यास सांगून ते स्वत: आणि त्यांचे बंधू फुलाजी प्रभू हे दोघेच त्या रणसंग्रामावर लढत राहिले. छत्रपती विशाळगडावर पोहचल्याचे समजताच मोगल सैन्य मागे फिरले. बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या देहाची चाळण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले, असे प्रधान म्हणाल्या.
>बाजीप्रभू चौकाचे सुशोभिकरण करणार
डोंबिवलीतील बाजीप्रभू देशपांडे चौकाचे तसेच अंबरनाथ शिवमंदिर येथील बाजीप्रभू रस्त्याचे सुशोभिकरण खासदार निधीतून करण्याची घोषणा यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. सीकेपी संस्थेच्या मंडळींनी त्यासाठी योजना तयार करावी. त्यांच्या देखरेखीखाली आपण हे काम करू, असे त्यांनी सांगितले.