केडीएमसीत मुख्यमंत्री पडले एकटे
By admin | Published: November 6, 2015 02:19 AM2015-11-06T02:19:58+5:302015-11-06T02:19:58+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
- यदु जोशी , मुंबई
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात शिवसेनेच्या मंत्र्यांनी ज्या पद्धतीने झोकून दिले, तसे भाजपाच्या मंत्र्यांनी का केले नाही, याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा काही जणांचा प्रयत्न होता का, अशी शंकाही या निमित्ताने पक्षांतर्गत चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम, दादा भुसे आणि इतरही नेते सहा दिवस कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून होते, तसे भाजपाच्या एकाही मंत्र्याने केले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी काही सभा घेतल्या, पण त्यांच्यासह कोणत्याही मंत्र्याने या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचे दिसले नाही, असे आता म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षसंघटना कामाला लावली, पण ते स्वत: इतर ठिकाणच्या महापालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत गुंतलेले होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन प्रचार सभा, एक विकास परिषद आणि २७ गावांसाठीची सभा अशी पाच भाषणे दिली. विकास परिषदेत त्यांनी स्मार्ट सिटीची पद्धतशीर मांडणी केली आणि निवडणुकीची सूत्रे स्वत:कडे घेतली. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली म्हटल्यानंतर, इतर मंत्र्यांनी त्यांना साथ दिल्याचे दिसले नाही. शिवसेनेत मात्र उलट चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे, तर आता यशापयशाचे धनीही तेच ठरतील, हा विचार करून तर सुरक्षित अंतर राखले गेले नाही ना, अशी चर्चादेखील या निमित्ताने होत आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतील संघ परिवाराने मनसेला साथ दिली होती. त्याचा मोठा फटका भाजपाला बसला होता. यावेळी असे होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी संघाच्या स्थानिक धुरिणांशी बंदद्वार चर्चा केली. मात्र, भाजपमधील एका बड्या नेत्याच्या कल्याणमधील समर्थकाने तिकीटवाटपात संघ-भाजपानिष्ठांना डावलल्याने संघ परिवार सुरुवातीला प्रचंड नाराज होता.
उपऱ्यांना संधी देण्यावरून परिवाराने प्रचारापासून दूर राहण्याची भूमिका सुरुवातीला घेतली होती. असे घडवून आणण्यासाठी भाजपातील काही लोक पडद्याआडून सक्रिय होते का, अशी शंका आता घेतली जात आहे.