केडीएमसीतील वाद ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा
By admin | Published: September 18, 2016 02:40 AM2016-09-18T02:40:24+5:302016-09-18T02:40:24+5:30
भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष संदीप गायकर व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यात पेटलेला वाद हा ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा असल्याची चर्चा आहे.
मुरलीधर भवार,
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष संदीप गायकर व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यात पेटलेला वाद हा ‘वाटा’ आणि ‘घाट्या’चा असल्याची चर्चा आहे. एखाद्या कामाकरिता केलेली तरतूद जेवढी मोठ्या रकमेची, तेवढीच त्यामधील वाट्याची रक्कम मोठी. मात्र, महापौरांनी तरतुदींना कात्री लावल्याने झालेल्या घाट्यामुळे राज्याच्या सत्तेतील हे पक्ष एकमेकांच्या उरावर बसले आहेत.
महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना काही सदस्यांनी सादर केलेल्या उपसूचना ग्राह्य धरून त्याला महासभेत अंतिम मंजुरी दिल्यानंतर स्थायी समिती व महासभेच्या अधिकारावर महापौरांनी कुरघोडी करीत कोट्यवधी रुपयांची कामे लाखांच्या घरात आणली, असे सभापती गायकर यांचे मत आहे. समितीमधील सदस्यांनी सुचवलेल्या कामांना कात्री लागल्याने सदस्यांच्या रोषाचे गायकर हेच धनी झाले. त्यामुळे निर्माण झालेली खदखद त्यांनी व्यक्त केली.
>२७ गावांना फटका बसला : महापालिका हद्दीत समावेश झालेल्या२७ गावांत पथदिवे उभारण्याच्या कामासाठी स्थायी समितीने ८५ लाख रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद महापौरांनी कमी करून ती २५ लाख रुपयांवर आणली. हायमास्ट बसवण्यासाठी ५० लाखांची असलेली तरतूद २५ लाखांवर आणली.
कंत्राटदार मनपसंत
नसल्याने विरोध
कल्याण पश्चिमेत उभारल्या जाणाऱ्या सिटी पार्ककरिता किमान १०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सविस्तर अहवाल व डिझाइन तयार करण्यासाठी कंत्राटदार नेण्यात आला आहे. हे कंत्राट ५४ लाख रुपये खर्चाचे आहे. त्याला मंजुरी दिली गेली असली तरी हा कंत्राटदार महापौरांच्या मर्जीतील नसल्याने महापौर नाखूश होते.
त्यांना एक कोटी रुपये खर्चाची अन्य कंत्राटदाराची निविदा मंजूर करण्यात स्वारस्य होते, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.