केडीएमसीचे संजय घरत यांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:34 AM2018-06-15T06:34:46+5:302018-06-15T06:34:46+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात रात्री उशिरा अटक केलेले नारायण परुळेकर यांना २८ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, घरत यांचे दोन मोबाइल जप्त केले असून त्याच्या पासवर्डमुळे तपासाला गती येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
सात मजली बेकायदा इमारतीवर कारवाई न करण्यासाठी घरत यांच्यासह ललित आमरे (४२) आणि भूषण पाटील (२७) या लिपिकांना आठ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले होते. या तिघांनी तक्रारदाराकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी आठ लाखांचा पहिला हप्ता बुधवारी देण्याचे ठरले होते. त्यावेळी ही कारवाई करण्यात
आली.
या प्रकरणात घरत यांच्या दालनात या तिघांची १७ तास चौकशी करण्यात आली. घरत यांच्या डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील मिलापनगर येथील घरीही बुधवारी रात्री छापा टाकण्यात आला. मात्र, तेथे ठोस काही हाती लागलेले नाही. दरम्यान, चौकशीनंतर गुरुवारी सकाळी ८ वाजता तिघांना ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथून दुपारी त्यांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.
दरम्यान, न्यायालयाच्या आवारात घरत यांना भेटण्यासाठी कंत्राटदार, उद्योगपती आणि कल्याण-डोंबिवलीतील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती.
मोठा भ्रष्टाचार उघड होईल : एसीबी
घरत हे जप्त केलेल्या त्यांच्या दोन मोबाइलचे पासवर्ड देत नाहीत. मोबाइलमध्ये महत्त्वाची माहिती असू शकते. आणखी काही जणांची नावे पुढे येतील. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो, असा संशय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यक्त केला.
पैशांची देवाणघेवाण सुरू असताना तक्रारदार आणि घरत यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केले आहे. पुरावा म्हणून सर्व चारही आरोपींच्या आवाजांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवायचे आहेत, असेही न्यायालयात सांगण्यात आले. त्यावर, न्यायालयाने संमती दर्शवत घरत यांच्यासह दोघांना १७ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.