केदारने उघडले विजयाचे ‘दार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 04:44 AM2017-01-17T04:44:46+5:302017-01-17T04:44:46+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याचा सहकारी फलंदाज केदार जाधव याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याचा सहकारी फलंदाज केदार जाधव याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. केदारची ही सर्वोत्तम खेळी ही व्यूरचनेनुसार खेळी असल्याचे विराटने सांगितले. केदार जाधवने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ७६ चेंडूंतच १२0 धावांची खेळी केली होती. केदारची ही वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. कर्णधार कोहलीनेदेखील या सामन्यात १0५ चेंडूंत १२२ धावांची खेळी केली. या दोघांच्या जबरदस्त खेळीने भारताने ३५१ धावांचे लक्ष्य ७ गडी गमावून पूर्ण केले.
कोहली म्हणाला, ‘‘ त्याच्या खेळीसाठी एकच शब्द आहे तो ‘अतुलनीय’. केदारने फिरकी गोलंदाजांवर दबाव वाढवला होता. मी जितक्या खेळ्या पाहिल्या त्यात ही सर्वोत्तम व्यूहरचनात्मक सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. त्याने काही खेळलेले नैसर्गिक फटके अविश्वसनीय होते.’’ कोहली आणि केदारने पाचव्या गड्यासाठी २00 धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला.
भारतीय कर्णधार म्हणाला, ‘‘तो असा खेळाडू आहे की जो कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करू इच्छितो. अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची त्याला माहीत आहे. त्यामुळे दुसऱ्या डावातही फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्याने सर्वच ‘क्लीन शॉट’ मारले. सहाव्या क्रमांकावर अशीच फलंदाजी करणे आवश्यक असते. त्याला दुसऱ्या एंडकडून मी चांगली साथ देऊ शकलो याचा मला आनंद वाटतो.’’ याआधीच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून न देऊ शकल्याने केदार नाराज होता, असे विराटने सांगितले. विराट म्हणाला, ‘‘मी त्याला त्याविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही आणि चांगली कामगिरी सुरू ठेवण्यास सांगितले.’’
परिस्थितीवर कसे नियंत्रण ठेवले याविषयी छेडले असता कोहली म्हणाला, आम्ही चर्चा करुन प्रतिहल्ला करणे हाच सर्वात चांगला उपाय असल्याचा निर्णय घेतला. कोणताही फलंदाज चांगल्या चेंडूवर बाद झाला नाही. दुसऱ्या डावातही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. आम्ही त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी षटकार ठोकू शकत होतो. मी ज्या भागीदाऱ्या केल्या त्यातील ही सर्वोत्तम भागीदारींपैकी एक आहे.’ (वृत्तसंस्था)
>केदार जाधवने संधीच दिली नाही : मॉर्गन
केदार जाधवच्या सुरेख खेळीने आमच्या योजनेवर पाणी फेरल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने व्यक्त केली. मॉर्गन म्हणाला, ‘‘आम्ही चार विकेट घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही सुमार गोलंदाजी केली याचे मला दु:ख वाटते. केदार अशी खेळी करील याचा विचारही आम्ही केला नव्हता. त्याने पहिल्या चेंडूपासूनच प्रतिहल्ला करणे सुरू केले आणि आम्हाला कोणतीही संधी मिळू दिली नाही.’’