लेप्टो रोखण्यासाठी गोठे स्वच्छ ठेवा
By admin | Published: July 21, 2016 02:30 AM2016-07-21T02:30:06+5:302016-07-21T02:30:06+5:30
पावसाळा सुरु व्हायच्या आधीच पालिकेने पश्चिम उपनगरातील गोठ्याच्या मालकांना नोटीस पाठवल्या होत्या.
मुंबई: पावसाळा सुरु व्हायच्या आधीच पालिकेने पश्चिम उपनगरातील गोठ्याच्या मालकांना नोटीस पाठवल्या होत्या. गोठ्यातील जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे असे सांगण्यात आले होते. पण, याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे यंदाही लेप्टोस्पायरसिस हा आजार डोके वर काढण्याचा धोका आहे.
गेल्यावर्षी लेप्टोस्पायरसिसने अचानक डोके वर काढल्यानंतर महापालिकेने लेप्टोस्पायरसिसची लागण इतक्या प्रमाणात कशी झाली हे शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम होती घेतली होती. या मोहीमेतपोर्ट ब्लेअरमधील नॅशनल सेंटरमधील तज्ज्ञ मुंबईत दाखल झाले होते. यावेळी उंदीर, घुशीं, कुत्र्यांसह गोठ्यातील जनावरांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पोर्ट ब्लेअर येथे पाठवण्यात आले होते. त्यावेळी अहवालात गोठ्यातील जनावरांमुळेही लेप्टोस्पायरसिसची लागण होऊ शकते हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे यंदा गोठ्याच्या मालकांना आधीच सूचना करण्यात आल्या होत्या. यंदा लेप्टोला रोखण्यासाठी गोठ्यांमधून पसरणाऱ्या या लेप्टोस्पायरोसीसच्या विषाणूंवर नियंत्रण मिळवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाढती अस्वच्छता, त्यावर पोसले जाणारे उंदिर-घुशी, ठिकठिकाणी साचणारे पाणी आणि त्यातून होणारा लेप्टोस्पायरोसीसचा प्रसार अशी साखळी आहे. तर, मुंबईच्या उपनगरातील संसर्गबाधित गोठ्यांमधील जनावरांकडून लेप्टोचा प्रसार होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. पश्चिम उपनगरातील गोठे मुंबईच्या बाहेर स्थलांतरित करण्यात आले आहेत. पण तरीही अजून काही गोठे आहेत. (प्रतिनिधी)