स्वच्छता राखा, आजार टाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:58 AM2017-07-26T05:58:37+5:302017-07-26T05:58:40+5:30
राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
मुंबई : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरू झाल्यावर दूषित पाणी आणि डासांमुळे होणारे आजार डोके वर काढतात. ताप, सर्दी, खोकल्याबरोबर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, डायरिया, गॅस्ट्रो अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर उघड्यावरचे अन्नपदार्थ, पाणी, यामुळे कावीळ, गॅस्ट्रो आणि डायरियाची लागण होण्याचा धोका असतो. या आजारांना रोखणे सहज शक्य आहे. दूषित अन्नपदार्थ आणि पाणी पिणे टाळल्यास, या आजारांना आळा घालता येऊ शकतो, तसेच अनेकदा घरी येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून
आणि गाळून पिणे हा सर्वात सुरक्षित उपाय असल्याचे डॉ. वरदा वाटवे
यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती होऊन डासांमुळे होणारे आजार बळावू शकतात. त्यामुळे डास चाऊ नयेत, म्हणून हात-पाय झाकले जातील, असे कपडे घाला. रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावा. रुग्णांना डास चावणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा. पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील, याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावा. आजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही, याची काळजी घ्या, तसेच उच्चभ्रू वस्त्या, इमारतींमध्ये डासांची पैदास होणाºया ठिकाणांचा शोध घ्या, असा सल्ला ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी दिला आहे.
पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकलासारखा त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरकडे जा. तपासणी करून घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
कुठे साचून राहते पाणी?
पावसाळ्यात पाणी फक्त घराबाहेर नाही, तर घरातही साचते. त्यामुळे घराची स्वच्छता महत्त्वाची आहे. घरात लावलेल्या झाडांच्या खाली ठेवण्यात येणाºया ताटल्या, फ्रीज, एसीचा डक, फेंगशुई प्लँट, शोभेची झाडे या ठिकाणी पाणी साचून राहते, तसेच घराबाहेर म्हणजे गच्चीवर, ताडपत्री, भंगाराच्या वस्तू, टायर, रिकामे डबे या ठिकाणी पाणी साचून राहते. सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वच्छ पाणी साचून राहिल्यास त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील आवाराची स्वच्छता केली पाहिजे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला पाहिजे. पावसाळी आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अतिशय आवश्यक आहे.
पावसाळी आजार टाळा, ही काळजी घ्या!
साचलेल्या दूषित
पाण्यातून (प्राण्यांचे मूत्र, रक्त) चालणे टाळा.
‘जोखीम’ गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखा.
कचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
रहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही, याची काळजी घ्या. अन्नपदार्थ स्वच्छ जागी
आणि झाकून ठेवावेत.
साचलेल्या पाण्यातून
चालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.
जास्त ताप,
डोकेदुखी, डोळे लाल
होणे, अशी लक्षणे
आढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन
उपचार घ्यावेत.