गोपनीयता बाळगत मुख्यमंत्र्यांनी दिली कोपर्डीला भेट
By admin | Published: July 24, 2016 05:12 PM2016-07-24T17:12:26+5:302016-07-24T17:41:41+5:30
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले.
बाळासाहेब काकडे/ मछिंद्र अनारसे
अहमदनगर, दि. 24 - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपर्डी येथे सांगितले.
रविवारी साडेचार वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोपर्डी (ता. कर्जत) येथे येऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिल्लीहून विशेष विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीत पोहोचले. तेथून कारने ते कोपर्डीत आले. दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी पीडित कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर चार ते पाच मिनिटे गावकऱ्यांशी संवाद साधला. पीडित कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. एका महिन्यात आरोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत जलसंधारण मंत्री राम शिंदे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष नामदेव राऊत, पोलीस पोटील समीर जगताप हे होते़ वीस मिनिटात ते बारामतीकडे रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. सकाळपासूनच राज्य गुप्त वार्ता विभागाचे व सीआयडीचे अधिकारी कोपर्डीत तळ ठोकून होते. तसेच कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा सकाळपासूनच होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला कोणीही दुजोरा दिला नव्हता. अखेरीस मुख्यमंत्री बारामतीमार्गे कोपर्डीत दाखल झाले. पीडित कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली.