चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक राखावा
By admin | Published: September 13, 2015 02:51 AM2015-09-13T02:51:46+5:302015-09-13T02:51:46+5:30
शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत
मुंबई : शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे राकेश मारिया यांच्या मुंबईच्या आयुक्तपदाच्या उचलबांगडीप्रकरणी राज्य सरकारला टोला हाणला.
माजी सहाय्यक आयुक्त इसाक बागवान लिखित ‘इसाक बागवान ’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. मी हा विषय कशासाठी काढला हे समजले असेल त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गृहराज्य मंत्री रणजीत पाटील, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले,‘ बारामतीच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील इसाक बागवान यांचा मोठा बंधू रझाक माझे वर्ग मित्र होते, त्यांनी कायद्याची पदवी घेतली. मी गृहराज्यमंत्री असताना अधिकाऱ्यांची नावांची यादी पाहिल्यानंतर इसाक पोलीस दलात असल्याचे समजले. सहा वेळा माझ्याकडे गृह खाते होते, एकवेळा राज्यमंत्री होतो पण एकदाही त्यांनी किंवा त्यांच्या बंधूनी आपल्याकडे बदलीसाठी विचारणा केली नाही. त्यांच्यासारख्या कर्तृत्वान अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्र पोलिसांची शान वाढलेली आहे. त्यांचा आदर्श नव्या अधिकाऱ्यांनी घेण्यासाठी
त्यांच्या पुस्तकाचा समावेश पोलिसांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात केला पाहिजे.
आयपीएस अधिकारीही बदलीसाठी राजकारण्याच्या मागे लागतात, असे सांगताना एका आयपीएस अधिकाऱ्याने एका खासदाराला पाठविलेल्या मेसेजचे उदाहरण देऊन पवार म्हणाले,‘ मुंबई पोलीस दल , गुन्हे शाखा हे एक सर्वोत्कृष्ट दल आहे.
त्याचा , चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक जपण्याची गरज आहे. या वेळी मला पुस्तक लिहायचे नव्हते. मात्र आपल्याकडून माहिती घेऊन दुसरीच माहिती माध्यमाकडून दाखविली जात असल्याने गैरसमज दूर करण्यासाठी स्वत: लिहिण्याचा निर्णय घेतल्याचे इसाक बागवान यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत, राज्यमंत्री पाटील, अभिनेते अनिल कपुर,अॅड. मजिद मेनन, माजी अधिकारी मधूकर झेंडे आदीची भाषणे झाली. व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, बापू करंदीकर, अभिनेते रजा मुराद, फरीद अली आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘इसाक बागवान’चे प्रकाशन : सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) इसाक बागवान लिखित ‘इसाक बागवान’ या आत्मचरित्राचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खा. संजय राऊत उपस्थित होते.