सांस्कृतिक ठेवा जपणारी ब्रह्मांड सोसायटी
By admin | Published: May 14, 2017 02:59 AM2017-05-14T02:59:27+5:302017-05-14T02:59:27+5:30
बसच्या फेऱ्या वाढवण्याच्या लढ्यापासून ब्रह्मांड सोसायटीच्या सामाजिक लढ्याला सुरूवात झाली.
- अजित मांडके
बसच्या फेऱ्या वाढवण्याच्या लढ्यापासून ब्रह्मांड सोसायटीच्या सामाजिक लढ्याला सुरूवात झाली. पुढे नवनवे विषय हाती घेतले गेले. ब्रह्मांड कट्ट्याने सांस्कृतिक क्रांती घडवली. वाचनालयाची चळवळ उभी राहिली. महिलांसाठी व्यासपीठ खुले झाले... एका सोसायटीने आपल्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवले. सांस्कृतिक ठेवा जपला. समृद्ध केला.
सर्वच स्तरांवर हायटेक पद्धतीचा वापर सुरू झाल्याने आपला सांस्कृतिक ठेवा कुठेतरी लोप पावत चालला आहे. नव्या पिढीला हा सांस्कृतिक ठेवा भविष्यात मिळेल की नाही, याबाबत आतापासून अनेकांच्या मनात शंका आहेत. असाच सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम घोडबंदर भागातील ब्रह्मांड सोसायटी कित्येक वर्षे करते आहे. ब्रह्मांड कट्टा, दिवाळी पहाट, ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रम, स्वागतयात्रा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदींच्या माध्यमांतून येथील सर्वधर्मीयांना एकत्रित बांधण्याचे काम या सोसायटीने केले आहे.
घोडबंदर भागातील ब्रह्मांडची फेज-१ सुमारे २५ वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. सुरुवातीला येथे तीनच इमारती होत्या. आज आठ फेजमध्ये सोसायटी उभी असून प्रत्येक फेजमध्ये सात इमारती आहे. आजघडीला येथे तब्बल साडेतीन ते चार हजार कुटुंबांचे वास्तव्य आहे. नुकताच या सोसायटीने आपला रौप्यमहोत्सव साजरा केला.
या भागात बसेसचे प्रमाण कमी असल्याने त्यासाठीचा लढा सुरुवातीला या सोसायटीने उभा केला. राजेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यातूनच प्रवासी संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून १५ वर्षांपूर्वी यशस्वी लढा उभा केला. सुरुवातीला या भागात केवळ आझादनगरची एकच बस धावत होती. तिच्या वेळाही एकेक तासाने होत्या. त्यामुळे बसची संख्या वाढण्यासाठी हे आंदोलन झाले. त्यातूनच पुढे धर्माचापाडा बस सुरू झाली. आतातर टीएमटीसह बेस्ट आणि एसटीची बसही या भागातून धावते.
हे या सोसायटीचेच यश म्हणावे लागेल. आता मुंबईच्या काही भागांसह अंधेरी, पनवेल आदी ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध झाल्याने सोसायटीसह इतर रहिवाशांनाही याचा फायदा झाला आहे. अशाच उपक्रमातून येथील रहिवाशांच्या मनात सामाजिक भावना रुजू लागली. त्यातूनच १२ वर्षांपूर्वी ब्रह्मांड कट्ट्याची संकल्पना पुढे आली. त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. यामागे उद्देशही तसाच होता. येथील संस्कृतीप्रिय रहिवाशांना व्याख्यानांच्या कार्यक्रमांसाठी ठाण्याच्या विविध भागांत जावे लागत होते. त्यातही ज्येष्ठांना प्रत्येक वेळी जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आपल्याच सोसायटीच्या ठिकाणी ही संकल्पना रुजवण्याची कल्पना राजेश जाधव आणि त्यांचे सहकारी जोशी यांच्या मनात आली. परंतु, त्यांना सतावत होता, खर्चाचा प्रश्न. यातूनही त्यांनी मार्ग काढला. हा खर्च त्यांनी स्वत:च्या खांद्यावर पेलला. आज त्याला सोसायटीमधील इतर सदस्यांनीही हातभार लावला आहे आणि या पाठबळावर कट्ट्याने एका तपाची यशस्वी वाटचाल केली आहे. ब्रह्मांड कट्ट्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची मेजवानीच येथील रहिवाशांना मिळू लागली. आता हा कट्टा एवढा प्रसिद्ध झाला आहे की, या कट्ट्यावरील कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी डोंबिवली, कल्याण आदींसह इतर ठिकाणाहून रसिक येतात.
पुढे चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या संकल्पनेतून येथे वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या वाचनालयाचा फायदा येथील आबालवृद्धांना होतो आहे. केवळ एवढ्यावरच या सोसायटीतील सदस्य थांबले नाहीत. नवरात्रोत्सवाची धूम, दरवर्षी भव्य प्रमाणात निघणारी स्वागतयात्रा, स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या माध्यमातून दरवर्षी रंगणारा ब्रह्मांड फेस्टिव्हल, रक्तदान शिबिर... असे भरगच्च उपक्रम सुरू असतात.
महिलांसाठीही मायबोली नावाचे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आल्याने त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कामही या माध्यमातून होताना दिसते. वाद कुठे होत नाहीत? तसे ते याही सोसायटीत होतात, परंतु एखादा प्रसंग ओढवला किंवा काही कार्यक्रम घ्यायचे झाल्यास या सोसायटीमधील सर्वच सदस्य एकदिलाने, एकोप्याने एकत्र येऊन काम करताना दिसतात. या सर्व माध्यमांतून या सोसायटीधारकांनी सामाजिक बांधीलकी तर टिकवली आहेच, शिवाय सांस्कृतिक ठेवा जपण्याचे कामही केले आहे.
काही वर्षांपूर्वी येथील एका इमारतीच्या सात घरांमध्ये एकाच वेळी घरफोडी झाली होती. त्यानंतर, येथील सर्वच रहिवासी या प्रसंगातही एकत्र आल्याचे बोधनकर यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून आज सर्वच सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली सर्व जण असतात. काही प्रसंग असेही असतात की, ज्यातून आपल्याला काहीतरी बोध घ्यावा लागतो. असाच हा प्रसंग म्हणावा लागेल, हेही त्यांनी सांगितले.