महाराष्ट्राला अग्रस्थानी कायम ठेवू

By admin | Published: January 28, 2017 03:21 AM2017-01-28T03:21:05+5:302017-01-28T03:21:05+5:30

देशातील प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवून, भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करू या

Keep the Maharashtra top | महाराष्ट्राला अग्रस्थानी कायम ठेवू

महाराष्ट्राला अग्रस्थानी कायम ठेवू

Next

मुंबई : देशातील प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राला अग्रस्थानी ठेवून, भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करू या, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापौर स्नेहल आंबेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, सेना दल, तटरक्षक दल, पोलीस दल आदी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल राव म्हणाले की, ‘आपल्या संविधानातील लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी, आपली बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी आणि देशाच्या, तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्यासाठी स्वत:ला वचनबद्ध करण्याचा हा दिवस आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या अन्य सदस्यांना मी याप्रसंगी नम्रपणे आदरांजली अर्पण करतो.’
राज्यात महानगरपालिका आणि पंचायत राज संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील ७३ व्या व ७४ व्या सुधारणांनंतर, घटनात्मक संस्थांचा दर्जा प्राप्त झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांप्रती आपला विश्वास व बांधिलकी लोकशाही आचरणातून प्रतिबिंबित होते. महाराष्ट्रातील जनतेने लोकशाही मूल्ये बळकट होण्यासाठी शिस्तबद्ध व शांततापूर्ण रीतीने आपल्या मताधिकाराचा अवश्य वापर करावा, असे आवाहनही राज्यपाल राव यांनी या वेळी केले.
तर प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी ‘वंदे मातरम’ या गीताचे समूहगान झाले. त्यानंतर, महापौरांनी सर फिरोजशहा मेहता यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी अग्निशमन दल व सुरक्षा दलाकडून मानवंदना देण्यात आली.
तसेच विद्याविहार पूर्वेकडील एस.के.सोमैया डी.टी.एड महाविद्यालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात भावी शिक्षकांकडून देशभक्तीपर समूह गीत सादर करण्यात आले. शिवाय ‘कलाकुंचले’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी भावी शिक्षक विद्यार्थ्यांनी मानवी पिरॅमिडचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष समीर सोमैया, महाविद्यालयाच्या प्रा. हिना गाला, लिलाबेन कोटक, राजन वेळूकर, मधुसिंग जाधव, प्रिया सिंघवी, अनुजा वांगीकर, वृषाली घाटे, मिरा सिंह, किरन तन्ना आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Keep the Maharashtra top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.