ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 06:24 AM2023-12-22T06:24:21+5:302023-12-22T06:24:44+5:30

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क 

Keep oxygen beds ready, start vaccinations: Eknath Shinde on corona new strain found maharashtra health update | ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

ऑक्सिजन बेड सज्ज ठेवा, लसीकरण सुरू करा : मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :  ‘जेएन-वन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदी सहभागी झाले होते. 

मास्क वापरण्याचे आवाहन
नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले. आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिक व फायर ऑडिट करावे, अशा सूचना दिल्या.

अफवा पसरवू देऊ नका 
सोशल मीडियावरून तसेच प्रसार माध्यमांवरून नव्या व्हेरिएंटसंदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे शिंदे म्हणाले. 
चुकीच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होण्याची भीती असते. अफवा पसरणार नाही याकरिता अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामग्री, इतर सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी १५ ते १७ डिसेंबर २०२३ या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ, आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स 
सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स 
उपलब्ध आहेत. 

ऑक्सिजन प्लँट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाइपलाइन्स, आरटीपीसीआर लॅब सुस्थितीत आहेत का, याची तपासणी करावी. लसीकरणाच्या दृष्टीने तयारी ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
 

Web Title: Keep oxygen beds ready, start vaccinations: Eknath Shinde on corona new strain found maharashtra health update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.